ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्ड फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:06 PM2019-06-29T13:06:40+5:302019-06-29T13:06:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून राज्यात कुठेही चार हजार किलोमीटर प्रवास करण्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन मंडळाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून राज्यात कुठेही चार हजार किलोमीटर प्रवास करण्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन मंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या कार्डासाठी तळोदा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांची फरफट होत आहे. कारण त्यांना येथून कार्डाची प्रक्रिया करण्याकरीता अक्कलकुवा डेपोत जावे लागत आहे. परंतु काम होत नसल्यामुळे त्यांना परत यावे लागत आहे. महामंडळाच्या धुळे विभागाने तळोद्यातच सुविधा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी ज्येष्ठांची अपेक्षा आहे.
राज्य शासनाच्या एस.टी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीसाठी नुकतीच स्मार्टकार्ड योजना जाहीर केली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना या स्मार्ट कार्डावर राज्यातून वर्षभरात चार हजार किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. महामंडळाच्या आदेशाच्या पाश्र्वभूमिवर अक्कलकुवा आगार प्रमुखांकडून स्मार्ट कार्डाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना 55 रूपयात हे कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधीतांनी आपले मतदान कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, रहिवासी दाखला आदी तत्सम कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. मंहामंडळाच्या या आकर्षक प्रवास सवलत योजनेमुळे साहजिकच ज्येष्ठ नागरिकही प्रभावीत झाले असून, अक्कलकुवा आगाराकडे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांची अक्षरश: झुंबड होत आहे.
तळोदा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकदेखील कार्डाची प्रक्रिया करण्यासाठी अक्कलकुवा येथे जात आहेत. तथापि तेथे रांगेत उभे राहूनही काम होत नसल्यामुळे रिकामे हात परत यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. एकाच कर्मचा:याची याकामी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यालाच संगणक संचावर माहिती भरण्याची प्रक्रिया करावी लागत आहे. त्यातच कनेक्टीव्हीटीच्या समस्येमुळे रांगेत तास्न तास उभे राहून ज्येष्ठ अक्षरश: वैतागले आहे. त्यातच आज या, उद्या या अशा मनमानीमुळे नाहक हेलपाटे मारून आर्थिक भरुदड सोसावा लागत असल्याची व्यथादेखील त्यांनी बोलून दाखविली.
वास्तविक अक्कलकुवा आगारात साधारण दोन हजार ज्येष्ठ नागरिकांनी अध्र्या तिकिटाच्या प्रवासाचा पास काढला आहे. त्यामुळे एवढय़ा लाभाथ्र्याची संख्या पाहून कर्मचारी संख्या वाढविणे अथवा खाजगी सुविधा केंद्र देणे अपेक्षित होते. या उलट अक्कलकुवा येथेच नागरिकांना बोलावून महामंडळाने गैरसोय केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. आधीच तेथे अक्कलकुवा तालुक्यातील पासधारक विद्याथ्र्याचा भार, त्यात पुन्हा स्मार्ट कार्डाच्या कामाची भर. परिणामी धड कुठलेच काम होत नसल्याचेही नागरिक सांगतात. तळोदा तालुक्यातील ज्येष्ठांची कार्डासाठी होत असलेली फरफट लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागाने तळोदा स्थानकातच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. एस.टी. महामंडळाच्या स्मार्ट कार्डाच्या आकर्षक योजनेला तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून शिवाय कर्मचा:यांवर इतर कामांचा वाढता भार लक्षात घेऊन अक्कलकुवा येथील आगार प्रमुखांनी तळोदा बसस्थानकात ही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या धुळे विभागाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. अक्कलकुवा आगारात स्वतंत्र कर्मचारी नेमून तसा फलक लावण्यात आला आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी दोन ते चार अशी वेळ ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संगणकात लाभाथ्र्याची कागदपत्रासह पूर्ण माहिती भरल्यानंतर प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसात स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.