सातपुडा साखर कारखान्याकडून उसाला 2200 दर निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:01 PM2018-09-17T12:01:39+5:302018-09-17T12:01:44+5:30
सर्वसाधारण सभा : गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाचा भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गाळप हंगाम 2017-18 साठी जाहीर केलेला ऊस दर एफआरपीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी व कारखान्याचे हित जोपासण्यासाठी प्रतीटन दोन हजार 200 रुपये दिलेला भाव देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
साखरेचे भाव खूपच खाली आल्याने साखर कारखान्यांना एफआरपी देणेही शक्य झाले नाही. ऊस गाळप करणे परवडत नसल्याने अनेक कारखान्यांनी हंगाम संपण्यापूर्वीच ऊस गाळप बंद केले होते. मात्र सातपुडा साखर कारखान्याने हंगाम 2017-18 मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप केला. सुरुवातीला पहिला हप्ता म्हणून नोंद उसाला 2100 रुपये प्रतीटन अदा केला आहे तर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दुसरा हप्ता आणखी प्रतीटन 100 रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर अदा करण्यात येणार आहे. तर उर्वरित तिसरा हप्ता प्रतीटन 200 रुपयांप्रमाणे जाहीर केलेला असला तरी कारखान्याचे आर्थिक पत्रकानुसार कारखान्यास जास्तीचा नऊ कोटी रुपये तोटा सहन करावा लागेल म्हणून उर्वरित 200 रुपयांचा तिसरा हप्ता देणे शक्य होणार नसल्याने हंगाम 2017-18 साठी नोंद उसासाठी अंतिम ऊस दर 2200 रुपये प्रतीटन प्रमाणे निश्चित करावा, असा ठराव चेअरमन दीपक पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत मांडला होता. त्यास सभासदांनी मंजुरी दिल्याने कारखान्याचा तोटा कमी करता येणे शक्य होणार आहे. एफआरपी दोन हजार 18 रुपये बसत असताना कारखान्याने 182 रुपये जादा देऊन सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.