नंदुरबार तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची बिनविरोधकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:35 PM2021-01-02T12:35:54+5:302021-01-02T12:36:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी ४७३ अर्ज अंतिम मुदतीत दाखल झाले होते. गुरुवारी अर्ज छाननीदरम्यान यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी ४७३ अर्ज अंतिम मुदतीत दाखल झाले होते. गुरुवारी अर्ज छाननीदरम्यान यातील १४ अर्ज अवैध ठरल्याने ४५९ जण निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील २२ पैकी ७ ग्रामपंचायती या बिनविरोध होणार असल्याने दाखल अर्जांच्या संख्येवरुन दिसून येत असल्याने येत्या सोमवारनंतर १५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.
गुरुवारी छाननी दरम्यान नंदुरबार तालुक्यातील खर्दे खुर्द ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊ अर्ज दाखल झाले होते. कंढरे ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी २६ अर्ज, बलदाणे ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी दहा, भादवड ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी ३८, कार्ली ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी ३७, खोक्राळे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी १२, निंभेल ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी १४, न्याहली ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १९, शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊ, तलवाडे खुर्द ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ३२, तिलाली ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊ, वैंदाणे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी ३०, आराळे ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी ७, भालेर ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी सर्वाधिक ५२, हाटमोहिदा ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २३, खोंडामळी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ११, कोपर्ली ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ४५, मांजरे ग्रामपंचायतीसाठी दहा, नगाव ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी २१, शिंदगव्हाण ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २६, विखरण ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी नऊ, तर काकर्दा ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २४ अर्ज दाखल करण्यात आले होते.
शनिमांडळ व तिलाली येथे सरपंचपदावर निर्णय
दरम्यान तालुक्यातील शनिमांडळ व तिलाली ह्या दोन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांंकडून आतापासूनच सरपंच पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यांतर्गत शनिामांडळ येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत गटाकडे चार वर्ष तर शिवसेना पुरस्कृत गटाकडे एक वर्षे सरपंच पद येणार आहे. तिलाली येथील ९ सदस्यांपैकी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत गटांकडे प्रत्येकी दीड वर्षे सरपंच पद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अखंड बैठकांच्या सत्रानंतर दोन्ही ग्रामपंचायतींसाठी तोडगा काढून त्या बिनविरोध करण्यात आल्या आहेत.
सात अर्ज बाद झाल्याने..
दरम्यान, निभेंल येथे सात सदस्य पदांच्या जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होते. पैकी सात अर्ज हे छाननीत अवैध ठरल्याने सातच अर्ज वैध झाल्याने तेथील ग्रामपंचायतही बिनविरोध झाली.
शहरी व निमशहरी भाग
२२ ग्रामपंचायतींपैकी खर्दे खुर्द, निंभेल, शनिमांडळ, तिलाली, आराळे, खोंडामळी, विखरण या गावांमध्ये जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आले होते. छाननी दरम्यान निंभेल वगळता इतर सहा ठिकाणचे सर्व अर्ज वैध ठरल्याने तेथील निवडणूक बिनविरोध झाली आहे.
४ जानेवारीनंतर याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भाग
दरम्यान, माघारीची अंतिम मुदत ही सोमवारपर्यंत आहे. यात काहींकडून उमेदवारी मागे घेण्याचे संकेत असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील काेपर्ली ग्रामपंचायतीसाठी ४५, तर भालेर ग्रामपंचायतीसाठी ५२ अर्ज दाखल झाले आहेत. ही दोन्ही गावे मोठी असून, तालुक्यात राजकीयदृष्ट्या प्रबळ मानली जातात. येथे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.