सात लाखांची यांत्रिकी बोट धुळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:26 PM2019-08-29T12:26:16+5:302019-08-29T12:26:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गेल्या 15 दिवसांपासून तापी नदीला सतत पूर येत असतानाही आपत्ती व्यवस्थापन मात्र बेफिकीर असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : गेल्या 15 दिवसांपासून तापी नदीला सतत पूर येत असतानाही आपत्ती व्यवस्थापन मात्र बेफिकीर असून, शासनाने येथे दिलेली सात लाख रूपये खर्चाची यांत्रिकी बोटही एका बंद खोलीत धूळखात पडून आहे.
याबाबत असे की, यंदाच्या पावसाळ्या जोरदार पाऊस होत असून, तापी व गोमती नदीला चार ते पाच वेळा पूर आला. मध्यंतरीच्या काळात शहादा-प्रकाशा, व प्रकाशा ते नंदुरबार रस्ता बंद झाला होता. या वेळी नदी, नाले ओसंडून वाहत होते. तेव्हा शासनाने दिलेली सात लाखांची यांत्रिकी बोट ही पाण्यात नव्हे तर चक्क गोडाऊनमध्ये धूळखात पडली होती.
याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्यांनी ही बोट घेऊन जाण्यास सांगितले. वास्तविक डिसेंबर 2018 मध्ये आपत्ती व्यवस्थापन नंदुरबार यांनी ही यांत्रिकी बोट, लाईफ जाकेट, अलास्का लॅम्प त्याचे स्टॅण्ड असे सर्वच वस्तू प्रकाशा बॅरेजला दिले होते. यासोबत पत्र पाठवले होते. मात्र प्रकाशा बॅरेज लगतच्या एका बंद खोलीत हे साहित्य ठेवले होते. दरम्यान सदरची बोट धूळखात पडून असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच संबंधितांनी सांभाळण्याऐवजी नंदुरबार येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाला घेऊन जाण्यास सांगितले.
आता ही बोट आणि साहित्य गावातील एका समाज मंदिरात गुंडाळून ठेवली आहे. यावरून असे दिसून येते की, आपत्ती व्यवस्थापन किती जागृत आहे. प्रकाशा 29 जुलै रोजी बॅरेजचे सर्व गेट उघडले तेव्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 9 ऑगस्ट रोजी दुस:यांदा तापी नदी दुथडी भरून वाहत होती. या काळात जोरदार पाऊस झाल्याने गोमती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. याप्रसंगी 11 ऑगस्टला तापी नदीच्या पुरात एक जण ओडक्यावर बसून बोराळा गावाकडून वाहत येत होता. त्याला वाचवण्यासाठी अनेकांनी प्रय}देखील केले. मात्र वाचवता आले नाही. त्यावेळी जर आपत्ती व्यवस्थापनाची यांत्रिकी बोट सज्ज राहिली असती तर त्यांना वाचवता आले असते.
एवढेच नव्हे तर 25 ऑगस्ट रोजी प्रकाशा बॅरेजचे पाणी सोडल्यामुळे एक जण वाहून गेल्याने मिसिंग दाखल करण्यात आली आहे, अशा वेळी जर यांत्रिकी बोट राहिली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. गेल्या वर्षी ऋषिपंचमीला महिलांची गर्दी लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाने प्रकाशा येथील मच्छिमारांना पुण्याला ट्रेनिंगसाठी पाठविले होते. दरम्यान ट्रेनिंग घेऊन आलेल्या मच्छिमारांना सण उत्सवात याठिकाणी सज्ज ठेवण्यात येते. ऋषिपंचमीला वाहून जाणा:या तीन महिलांना या मच्छिमारांनी वाचवले होते.
प्रकाशा येथील मच्छिमारांनी प्रशिक्षण घेतले असून, त्यांना जर चार महिने पावसाळ्याचे पगारासह नदीकाठी ठेवले तर अशी दुर्घटना होणार नाही. मात्र नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन फक्त रोजंदारी सारखं पावसाळ्यात काम करून घेते. तापी नदीवरील भाविकांचा ओघ लक्षात घेता काठावर यांत्रिक बोट सज्ज ठेवायलाही हवी, गणपती उत्सव, ऋषिपंचमी, नवरात्री, आदी सण पुढे येत आहे. मूर्ती विसर्जनासाठी प्रकाशा येथे येतात भाविकांची गर्दी लक्षात घेता केदारेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर या तीनही ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग व शहादा महसूल विभाग यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. मात्र संबंधितांनी यांत्रिकी बोट का गुंडाळून ठेवल्याचा जाब जिल्हाधिका:यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास विचारावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रकाशा येथे आपत्ती व्यवस्थापन आहे. गावातील 12 मच्छीमारांना आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण दिले आहे. परंतु त्यांना जर चार महिने पगार दिला तर ते सजग राहतील. मात्र त्यांना वर्षातून 10 ते 12 दिवसच काम दिले जाते. तेवढय़ाने त्यांचे भागत नसून, चार महिने तरी त्यांना पगार देण्यात यावा, अशी अपेक्षा आहे.