तिघा बाधितांच्या संपर्कात आले सातजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:36 PM2020-04-22T12:36:56+5:302020-04-22T12:37:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल चौघा कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय पथक नजर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल चौघा कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय पथक नजर ठेवून आहे़ दरम्यान मंगळवारी अहवाल आलेल्या तिघांच्या संपर्कात सात जण आले होते़ या सर्वांचा प्रशासनाने शोध घेत त्यांना क्वारंटाईन केले आहे़
प्रभाग क्रमांक १० मधील ४८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांचे नमुने धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी देण्यात आले होते़ पहिल्या दिवशी १९ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाला दिलासा मिळाला होता़ परंतू सोमवारी बाधिताची आई, मुलगा आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती़ चौघांना आयसोलेश वॉर्डात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत़ मंगळवारी या चौघांच्या नियमित तपासण्या करण्यात आल्या आहेत़ तपासणीनंतर त्यांचे नमुने पुन्हा धुळे येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे़ बाधित असलेल्या तिघांच्या संपर्कात आलेल्यांचा मंगळवारी सकाळपासून शोध घेण्यात येत होता़
प्रभाग १० मधील नव्याने समोर आलेल्या तिघांच्या संपर्कात सात जण आल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांना तातडीने क्वारंटाईन करुन त्यांचे नमुने संकलित करण्यात आले आहे़ या नमुन्यांची तपासणी सध्या सुरु असून त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे़ सातही जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती आहे़ दरम्यान नगरपालिकेकडून या भागात निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे़ संपर्कात आलेल्या सात लोंकांची हिस्ट्रीही तपासण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़