अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:34 AM2017-09-22T11:34:54+5:302017-09-22T11:34:54+5:30
आरोपी होता पुजारी : पोक्सोअंतर्गत पहिलाच निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणा:या पुजा:यास पोक्सो कायद्याअंतर्गत सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. दरम्यान, पोक्सो कायद्याअंतर्गत प्रथमच अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी, सुंदरदे ता.नंदुरबार येथील मंदीरातील पुजारी कनवर रुपल्या गावीत उर्फ कन्हैया महाराज याने 18 जुलै 2016 रोजी सकाळी शाळेत जाणा:या 13 वर्षीय बालिकेला जबरीने मोटरसायकलीवर बसवून तिचे अपहरण केले. यासंदर्भात बालिकेच्या वडिलांनी उपनगर पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता. कन्हैया महाराज याने मुलीला देवमोगरा येथे नेवून तिच्यावर अत्याचार केला तसेच चौथ्या दिवशी प्रकाशा येथे नेले. तेथे त्याला व मुलीला ओळखीच्या व्यक्तीने पाहून आरडाओरड केली व लोकांच्या मदतीने त्याला पकडून प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात जमा केले. त्यानंतर मुलीच्या माहितीवरून महाराजाविरुद्ध वाढीव पोस्को कलम लावण्यात आले.
पोलीस उपनिरिक्षक बी.एम.केदार यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून तो अटकेतच होता.
जिल्हा सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांचीही साक्ष तपासण्यात आली. सर्व साक्षी आणि इतर बाबी तपासून न्या.अभय वाघवासे यांनी कनवर गावीत उर्फ कन्हैया महाराज यांना पोक्सो कायद्याखाली सात वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, भादंवि कलम 363 अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड तसेच कलम 376 अन्वये सात वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. याकामी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड.निलेश देसाई यांनी काम पाहिले.