खडकापाणीच्या पाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:32 PM2020-07-02T12:32:46+5:302020-07-02T12:32:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणीच्या सहा पाड्यांमधील हातपंपांना पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणीच्या सहा पाड्यांमधील हातपंपांना पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान वळवीपाडा येथे एक हातपंप जेमतेम चालतो तर माथाआंबापाडा येथे सात पैकी एकच हातपंप सुरू असल्याने याठिकाणी पाणी भरण्याकरीता गर्दी होत असते. तर उर्वरित पाड्यांवरील नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिऱ्यातून चढउतार असलेल्या पायवाटेने पाणी आणावे लागत असते.
दरम्यान, काही नागरिकांना घर बांधकाम मटेरियलचे साहित्य असतानाही पाण्याअभावी घरे बांधायला अडचणी येत आहेत. तसेच पाणीटंचाईमुळे लग्नासाठी इच्छूक असलेल्या तरूणांना पालक आपल्या मुली देत नाही. या वेळी गावाचे नाव ऐकूनच मुलीवाल्यांकडून लग्नासाठी नकार दिला जात असल्याची खंत लग्नासाठी इच्छूक असलेल्या युवकाने व्यक्त केली.
वळवीपाडा येथे सात हातपंपाना पाणी नसल्यामुळे या पाड्यांवरील नागरिकांना पायपीट करीत दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिºयातून पाणी आणावे लागत आहे. तसेच पाडवीपाडा येथे चार हातपंप आहेत. परंतु त्यातील तीन हातपंपांना पाणी नाही तर एका हातपंपाला जेमतेम पाणी येत असल्याने एक हंडाभर पाणीला दोन तास लागत असल्याने रात्री उशिरापर्यंत या परिसरातील नागरिकांना पाणी भरावे लागत आहे.
पाटीलपाडा येथेही आठ हातपंप आहे. मात्र त्यातील एक हातपंप सुरू असून, त्यातही पुरेसे पाणी नसल्याने पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिºयामधून येथील नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. माथाआंबापाडा येथेही सात हातपंप आहे. त्यातील एक हातपंप सुरू असल्याने याच हातपंपावर नागरिक पाणी भरण्यासाठी गर्दी करीत असतात. या हातपंपावर पाणी भरण्यासाठी पायवाटेने २०० ते ३०० मिटर अंतरावरून ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी येत असतात.
देवजीपाडा येथे तीन हातपंप असून, त्यात एक हातपंप चालू असून ज्यांना हातपंप लांब पडत असते ते माथाआंबापाडाच्या २०० मिटर अंतरावर असलेल्या दरीतुन पाणी आणावे लागत असते. डोटकीपाडा येथे सात हातपंप असून त्यात पाच हातपंप बंद असल्याने या पाड्यांवरील नागरीकांना पश्चिमेला ७०० ते ८०० मिटर अंतरावर असलेल्या हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.
खडकापाणीच्या या पाड्यांवर खडकाळ भाग असल्याने २०० फुटांवर पाणी लागत नसून, हातपंप टाकून ही उपयोग होत नाही. त्यांमुळे ५०० फुटापर्यत पाईप टाकणे गरजेचे आहे. या भागात फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याची टंचाई निर्माण होत असते. -दिलीप पाडवी, ग्रामस्थ, पाडवीपाडा
घरकुल मजुंर असताना घरकुलासाठी लागणारे साहित्य आणून ठेवले जात आहे. मात्र पाणी नसल्याने घराचे बांधकाम करता येत नाही. जेव्हा पाण्याची सोय होते तेव्हा घराचे बांधकाम करीत असतात. शक्यतो पावसाळ्यात घराचे बांधकाम केले जाते कारण पावसाळ्यात पाण्याची अडचण निर्माण होत नाही.
-गणेश वसावे, ग्रामस्थ, पाडवीपाडा
लग्ना योग्य तरूणांनासाठी मुलीची मागणी केली जाते. तेव्हा खडकापाणी गावाचे नाव ऐकूनच मुलीवाल्यांकडून मुली देण्यास नकार दिले जात असून, गावात पाणीटंचाई असल्याने मुली देण्यास नकार देतात.
-नीतेश वसावे, युवक, पाडवीपाडा