शहादा पुन्हा चार दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:52 PM2020-07-05T12:52:56+5:302020-07-05T12:53:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहर व नजीकच्या लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्रात शुक्रवारी आठ कोरोना विषाणू बाधीत रूग्ण आढळल्याने त्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहर व नजीकच्या लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्रात शुक्रवारी आठ कोरोना विषाणू बाधीत रूग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ५ एप्रिलपासून ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वैद्यकीय सुविधा, मेडीकल स्टोअर्स, दूध, शासकीय कार्यालये व शासकीय धान्य गोडाऊन वगळता सर्व प्रकारचे आस्थापना व दुकाने बंद करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सीडेंट कमांडर डॉ.चेतन गिरासे यांनी दिले आहेत.
शहादा तालुक्यात ३ जुलै रोजी आठ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यातील सात शहादा शहरातील नगरपालीका हद्दीतील व एक जण लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्रातील आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात नव्याने कंटेनमेंट व बफर झोनची निर्मिती केली असून संपूर्ण शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने ८ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिकांना विशेष प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत.
प्रतिबंधात्मक क्षेत्र
मराठा गल्ली कुकडेल मधील परिसर मराठा गल्ली, आझाद चौक, बफर झोनमधील सिद्धार्थनगर, लुमगल्ली, अमरधाम परिसर, शिवाजीनगर, भवानी चौक, सरदार वल्लभभाई पटेल चौक परिसर, खंडेराव मंदिर परिसर, साळीगल्ली, गांधीनगर परिसर, सिंधी कॉलनी, रामनगर, सालदारनगर या भागाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक क्षेत्रामधील परिसर सदाशिवनगर प्रतिबंधात्मक क्षेत्र व बफर झोनमध्ये स्वस्तिक नगर, महावीरनगर, आनंदनगर, वडनेरेनगरचा समावेश आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रामधील परिसर कल्पनानगर, वृंदावननगर, श्रीकृष्ण कॉलनी, बफर झोनमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसर, मोहिदा चौफुली परिसर, पटेल रेसीडेंन्सी परिसर, बसस्थानक, स्टेट बँक चौक व परिसर, दोंडाईचा रोड प्रवेशद्वारापर्यंतचा परिसर, प्रेस मारूती मंदिर परिसर समाविष्ट करण्यात आलेला आहे.
शहरात आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांचे स्वॅबचे नमुने २८ जून रोजी घेण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांना मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले होते. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी रात्रीच कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेल्या प्रत्येक प्रभागात जाऊन कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले. शहादा व लोणखेडा येथील आठही रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी दिली. बाधीत रुग्णांच्या अतिसंपर्कातील नागरिकांचा शोध प्रशासनातर्फे घेण्यात येत असून बाधीत रूग्ण राहत असलेल्या भागात पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत बॅरिकेटींग व औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे.
प्रशासनातर्फे शनिवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक नागरिकांनी सोशल डिस्टन्स न पाहता आवश्यक वस्तू खरेदी केल्या. प्रामुख्याने किराणा दुकानांवर सर्वाधिक गर्दी होती तर मुख्य बाजारपेठेत नागरिकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आले होते. लॉकडॉऊनच्या कालावधीत शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी केले आहे.
दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कातील १४ जणांना मोहिदे रस्त्यावरील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून २० जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तालुक्यातील ४८ जणांच्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा लागून आहे.
शहरात आढळलेल्या सात बाधीत रुग्णांपैकी रशिया येथून परतलेल्या विद्यार्थिनीचा अहवाल हा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने २७ जूनला रात्री या विद्यार्थिनीला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते. २८ जूनला तिचे स्वॅब नमुने घेतले गेले व ३ जुलैला रात्री तिचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सर्व रूग्णांंना रात्री विशेष रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका रुग्णाचा शहरातील बसस्थानक परिसरात भेळपुरी विक्रीचा व्यवसाय आहे.