मारहाण करणाऱ्या तिघांना शहादा न्यायालयाकडून कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:37 AM2019-02-14T11:37:08+5:302019-02-14T11:37:18+5:30
शहादा न्यायालय : कोंढावळ येथे घडली होती घटना
नंदुरबार : शेतीच्या वादातून मारहाण करणाºया कोंढावळ येथील दोघांना शहादा न्यायालयाने तीन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
२६ जून २०१४ रोजी ही घटना घडली होती. सरलाबाई आत्माराम शेवाळे हे आपले पती आत्माराम शेवाळे यांच्यासह त्यांच्या कोंढावळ शिवारातील शेतातून जात होते. त्यावेळी रवींद्र हिलाल माळी, हिलाल बाजीराव माळी यांनी शेतातून जाण्यावरून वाद घातला. शिविगाळ केली. घरी आल्यावर दोघांनी लाकडी दांडक्याने आत्माराम शेवाळे यांच्यावर वार केला. तसेच हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत ते बेशुद्ध पडले. त्यांच्या नाकातोंडातून रक्त येवू लागल्याने त्यांना तातडीनने अर्जून माळी, राजाराम माळी, आसाराम माळी यांनी अॅपेरिक्षाने वडाळी, ता.शहादा आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत सरलाबाई आत्माराम शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र व हिलाल माळी यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक विनोद पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.बी.नायकवाड यांच्यापुढे हा खटला चालला. न्यायालयाने रवींद्र हिलाल माळी व हिलाल बाजीराव माळी यांना दोषी धरत तीन वर्ष कारावास व दहा हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली तर इतर दोघा संशयीतांना निर्दोष सोडले. सरकारी पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार महेंद्र सोनवणे होते.