शहादा-खेतिया रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, अवजड वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:36+5:302021-09-21T04:33:36+5:30

हाकेच्या अंतरावर घर अन् काळाचा घाला साहेबराव दौलत पाटील (५४, रा.ब्राह्मणपुरी, ता.शहादा) हे १८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या ...

The Shahada-Khetiya road has become a death trap, the need to discipline heavy vehicle owners | शहादा-खेतिया रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, अवजड वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज

शहादा-खेतिया रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, अवजड वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज

Next

हाकेच्या अंतरावर घर अन् काळाचा घाला

साहेबराव दौलत पाटील (५४, रा.ब्राह्मणपुरी, ता.शहादा) हे १८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास लोणखेडाहून चांदसैली ओंडालून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या आपल्या ब्राह्मणपुरी गावी मोटारसायकलीने (एम.३९ पी-१००२) येत असताना पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर बेजबाबदारपणे गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक (एम.पी.०९ एच.एच.१०२४) उभा होता. या ट्रकला मागून मोटारसायकलीची धडक झाल्याने साहेबराव दौलत पाटील हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कुटुंबीयांना व नातेवाईकांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपाययोजनेची मागणी

शहादा-खेतिया मार्गावरील सुसरी धरणापासून खेडदिगर या मार्गावर वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे वाहतुकीच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून वाढते अपघात रोखण्याबाबत तातडीने पावले उचलणे गरजचे आहे. चांदसैली, ब्राह्मणपुरी, सुलतानपूर फाटा, खेडदिगर या ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतात. गेल्या दहा दिवसांपूर्वी सुलतानपूर फाट्यानजीक बेजबाबदारपणे उभी असलेल्या ट्रकला मागून धडक देत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी मिरची घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या पीकअपला धडक दिल्याने ट्रकचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. हे अपघात रोखण्याबाबत योग्य त्या उपयायोजनांची गरज आहे. या मार्गावरील रस्ता, दुभाजकांना, मध्येच थांबणाऱ्या वाहनांचा, त्याचबरोबर सुसाट व बेजबाबदार वाहने चालविण्याचा प्रश्न आता जीवघेणा ठरू लागला आहे. धूम स्टाईलने शहादा-खेतिया मुख्य रस्त्यावर अवजड वाहने चालविणाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. या रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना व छोट्या वाहनधारकांना मोकळा श्वास कधी घेता येणार? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे. या मार्गावरील डिव्हायडरची व्यवस्था, स्पीड ब्रेकर्स, झेब्रा क्रॉसिंग पट्टे आदी कामे ठिकठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या मार्गावरील वाहतुकीची भयावह परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्यक्ष कार्यवाहीतून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: The Shahada-Khetiya road has become a death trap, the need to discipline heavy vehicle owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.