शहाद्यात साडेतीन लाखांचे मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:54 AM2017-08-14T00:54:44+5:302017-08-14T00:55:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : खेतिया येथून बेकायदेशीररित्या गुजरात राज्यातील उधना, जि.सुरत येथे मद्याची वाहतूक करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या जीपसह ६६ हजार ५०० रुपये किमतीचे विदेशी मद्य असा एकूण तीन ६६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत असे की, खेतिया येथून गुजरात राज्यात मद्याची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त वार्ता मिळाल्यानंतर येथील डोंगरगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपानजीकच्या चौफुलीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, हवालदार विलास अजगे, भटू धनगर यांच्या पथकाने सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास पांढºया रंगाची जीप क्रमांक जीजे ५ - सीएम ६४१४ हिला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने याकडे दुर्लक्ष करीत गाडीचा वेग वाढवत पुढे नेली. या वेळी सिनेस्टाईलने गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी गाडीला अडवून चौकशी केला असता त्यात ६६ हजार ५०० रुपये किमतीचे बॉम्बे स्पेशल विस्कीचे बॉक्स आढळून आले.
याबाबत शहादा पोलिसात हवालदार विकास अजगे यांच्या फिर्यादीवरून कैलास जनार्दन कोळी (२३) रा.उधना व विराज राजू खंडारे (२१) रा.उधना जि.सुरत या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशतून गुजरात राज्यात मद्याची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. परिणामी दररोज लाखो लीटर बनावट मद्याची तस्करी शहादा तालुक्यातून होत असते. या तस्करीला व तस्करांचा कायमस्वरूपी मुसक्या आवळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.