धाडसी घरफोडीमुळे शहाद्यात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:13 PM2018-09-19T12:13:26+5:302018-09-19T12:13:31+5:30
शहादा : बागवान गल्लीत झालेल्या धाडसी घरफोडीने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांनी व्यापा:याचे 14 लाख 50 हजार रुपये रोख चोरू नेले. केवळ रोख रक्कमच गेली. इतर वस्तूंना चोरटय़ांनी हात लावलेला नसल्यामुळे माहितीगारचे हे काम असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी तीन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बागवान गल्लीत राहणारे व गांधी पुतळ्याजवळ रेडीमेड कापडाचे दुकान असलेले व्यापारी मोहमद हारून मोहम्मद खात्री यांच्या घरी ही घटना घडली. व्यापारासाठीचे 14 लाख 50 हजार रुपये त्यांनी घरातील गोदरेज कपाटात ठेवले होते. घरात चार भाऊ राहतात. सोमवारी सकाळी सर्वजन दुकानावर गेल्यानंतर सायंकाळी शरफोद्दीन हा पाणी भरण्यासाठी घरी गेला होता. पाणी भरून तो परत दुकानावर आला होता. रात्री दुकान बंद करून सर्व भावंड घरी गेले असता त्यांना घराचे चॅनेल गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जावून तपास केला असता लोखंडी कपाटाचे कुलूप देखील चोरटय़ांनी तोडलेले होते. कपाटात दोन स्टिलच्या डब्यात ठेवलेले 14 लाख 50 हजार रुपये रोख घेवून चोरटय़ांनी पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. मोहमद खात्री यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलीस निरिक्षक संजय शुक्ल यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मंगळवारी दुपारी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरिक्षक शुक्ला यांनी सांगितले.
दरम्यान, शहारासह परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.