प्रकाशा बॅरेजच्या जलसाठय़ात शहाद्यातील युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:43 PM2018-03-25T12:43:31+5:302018-03-25T12:43:31+5:30
दोन दिवसांपासून बेपत्ता : दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर सापडला मृतदेह
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 25 : शहादा येथील गौरव विठ्ठल पाटील या युवकाचा मृतदेह प्रकाशा बॅरेजच्या जलसाठय़ात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहादा येथील गांधीनगरातील गौरव विठ्ठल पाटील (22) हा युवक शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता नंदुरबारकडे स्कूटीने जाण्यासाठी निघाला होता. तो रात्री उशिरार्पयत घरी न आल्याने नातेवाईकांसह मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही. प्रकाशा बॅरेजच्या गेटजवळ पांढ:या रंगाची विना नंबरची स्कूटी उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ती स्कूटी गौरवचीच असल्याची खात्री नातेवाईकांची झाली. त्याने पाण्यात उडी तर घेतली नसावी त्यादृष्टीने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने जाळी, आकडे पाण्यात टाकून शनिवारी सकाळपासूनच शोध घेण्यास सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास गौरवचा मृतदेह आकडय़ाला लागला. बॅरेजच्या गेट क्रमांक 26 जवळ गौरवचा मृतदेह सापडला.
घटनेची माहिती कळताच जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, उपसरपंच भरत पाटील, रफीक खाटीक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयगणेश पाटील, किशोर चौधरी, प्राचार्य मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, प्रशांत निकुम, संतोष वाल्हे, दत्तू चौधरी, कृष्णदास पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.जितेंद्र पवार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून जमादार पांडुरंग गवळी, हवालदार गौतम बोराळे, नीलेश सांगळे, उमद्या गुलाले यांनी पंचनामा केला.