रुग्ण वाढल्याने शहादेकर चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:50 AM2020-07-16T11:50:31+5:302020-07-16T11:50:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्याने कोरोना बाधित रुग्णांचे अर्धशतक पार केले असून गेल्या २४ तासात तालुक्यात १४ व्यक्तींचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्याने कोरोना बाधित रुग्णांचे अर्धशतक पार केले असून गेल्या २४ तासात तालुक्यात १४ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांसाठी चिंतेची बाब झाली आहे. विशेष म्हणजे या १४ पैकी ११ रुग्ण हे शहरातील आहेत.
मंगळवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली. यात शहादा शहरातील पाच व तालुक्यातील जयनगर येथील एकाचा समावेश आहे. या सहा रुग्णांपैकी पाच रुग्ण शहरातील असून त्यातील दोघे हे मोहिदा क्वारंटाईन सेंटर येथे संशयित रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेण्याचे काम करत होते. बुधवारी दुपारी व सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त अहवालापैकी पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले असून हे सर्व शहादा शहरातील आहेत. यात गरीब नवाज कॉलनी, म्हसावद रोड, वृंदावननगर व पुसनद ता.शहादा (ह.मु.शहादा) येथील आठ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. गेल्या २४ तासात तालुक्यात १४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून पैकी ११ रूग्ण शहादा शहरातील असल्याने शहरातील सर्वच भागात कोरोना विषाणूचे संक्रमण सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५० पेक्षा अधिक झाली असून यातील चार मयत झाले आहेत. बाधित रुग्णांमध्ये चार कोरोना योद्धांचा समावेश आहे. यातील दोन कोरोना योद्धा हे १८ मार्चपासून प्रत्यक्ष फिल्डवर काम करत होते तर उर्वरित दोन कोरोना योद्धा हे मोहिदा शिवारातील क्वारंटाईन सेंटरमध्ये संशयित नागरिकांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्याचे काम करत होते. सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय कर्मचारीही कोरोना बाधित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ३१ मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन असल्याने शहरात व तालुक्यात रुग्णांची संख्याही मर्यादित होती. मात्र अनलॉक-एकच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली तर मिशन बिगीन अगेन या टप्प्यात १ जुलैपासून शहरातील रुग्णांची संख्या वाढ झाली आहे.
कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी बाळगली जात असली तरी वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत असतानाही रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन हवालदिल झाले आहे तर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . मिशन बिगीन अगेन या टप्प्यात विशेष सवलती शासनाने दिल्या असल्या तरी याचा कुठेतरी गैरफायदा घेतला जात असावा की ज्यामुळे रुग्णांंच्या संख्येत वाढ होत आहे. यात प्रामुख्याने आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर काळजीपूर्वक वाहनांची तपासणी होत नाही, शासनाची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता नागरिकांचे शहरात होणारे आगमन, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर तालुक्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची व कर्मचाऱ्यांची दररोज कुठलीही वैद्यकीय तपासणी होत नाही, शेजारील शिरपूर, दोंडाईचा व नंदुरबार ही शहरे कोरोना हॉटस्पॉट ठरली असतानाही येथून येणाºया जाणाºया नागरिकांची कुठलीही प्रशासनाकडे नोंद नाही. अशा अनेक बाबींमुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत आहे, असे मत जाणकार नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
शहादा शहरात अचानक रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनावर कमालीचा ताण वाढला आहे. विशेष म्हणजे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या बाधित रुग्णाच्या अतिसंपर्कातील व कमी संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन सेंटर येथे रवाना करण्यासाठी मंगळवारी सहा रुग्णांचा अहवाल आल्यानंतर संपूर्ण रात्रभर पालिका, पोलीस व महसूल विभागातील कर्मचारी कार्यरत होते. त्यात नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने मध्यरात्रीपर्यंत या कर्मचाºयांना बाधित रूग्णाच्या परिसरातच थांबावे लागले.
४शहादा शहरातील जिजाऊनगर येथील दोन व तालुक्यातील तोरखेडा येथील तीन असे पाच बाधित रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयामार्फत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्णवाहिकेद्वारे घरी पोहचविण्यात आले आहे. एकीकडे वाढती संख्या ही चिंतेची बाब असली तरी कोरोना विषाणू संक्रमणावर मात करणाºयांची संख्या वाढत असल्याने ती तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे.