हमाल-मापाडी व व्यापारी यांच्यातील दरवाढीचा तिढा अखेर सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:02 PM2020-11-29T13:02:29+5:302020-11-29T13:02:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हमाल मापाडींना १६ टक्के त्रैवार्षीक दरवाढ मिळाल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हमाल मापाडींना १६ टक्के त्रैवार्षीक दरवाढ मिळाल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आता सुट्टीनंतर अर्थात १ डिसेंबरपासून नियमित कामकाजाला सुरवात होणार आहे. हमाल मापाडी, व्यापारी व बाजार समिती संचालक यांची संयुक्त बैठक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
नंदुरबार बाजार समितीतील हमाल मापाडींनी त्रैवार्षीक दरवाढ मिळावी या मागणीसाठी गुरुवारपासून बंद पुकारला होता. त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. या संदर्भात बैठका होऊनही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे शनिवारी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढत तिढा सोडला.
त्रैवार्षीक दरवाढ
हमाल मापाडी व व्यापारी यांच्यात दराचा करार हा तीन वर्षांसाठी असतो. त्याअंतर्गत दर तीन वर्षांनी नवीन दरवाढ लागू केली जाते. यंदा ऑक्टोबर अखेर त्रैवार्षीक मुदत संपली होती. नोव्हेंबरपासून नवीन दर लागू होणे अपेक्षीत होते. परंतु ते लागू झाले नव्हते. या संदर्भात हमाल-मापाडी व व्यापारी यांच्यात बैठकही झाली होती. दरवाढ होत नसल्याचे पाहून हमाल मापाडींनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज ठप्प झाले होते.
१६ टक्के दरवाढ मान्य
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शनिवारी हमाल-मापाडी, व्यापारी व बाजार समिती संचालक यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी दोन्ही बाजू ऐकुण घेण्यात आल्या. त्यानुसार रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. व्यापारी व हमाल संघटना यांनी १६ टक्के दरवाढीवर एकमत केल्याने तिढा सुटला. यावेळी व्यापारींनी हमालमापाडींचा तर हमाल मापाडींनी व्यापारी प्रतिनिधींचा औपचारिक सत्कार केला.
शेतकऱ्यांना वेठीस धरू नका
यावेळी मार्गदर्शन करतांना चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, दरवाढीमुळे शेतकरी वेठीस धरला जात आहे. सद्या मिरचीचा हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विविध शेतीमालाची आवक देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच वातावरण देखील ढगाळ राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यापारी व हमाल-मापाडी प्रतिनिधींनी सामंजस्याने घेवून व सर्वसंमतीने तोडगा काढावा असे आवाहन केले. त्यानंतर दोन्ही बाजू त्यांनी ऐकुण घेत १६ टक्के दरवाढीवर एकमत करून घेत दोघा गटाला राजी केले.
यावेळी हमाल-मापाडी संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील, पदाधिकारी संतोष पाटील, देवाजी माळी व पदाधिकारी तर व्यापाऱ्यांतर्फे ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष हरेश जैन, महेश जैन, गिरीश जैन, धिरज जैस्वाल, भूपेंद्र जैन उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील, संचालक सयाजी मोरे, रोहिदास राठोड, भरत पाटील, किशोर पाटील, हिरालाल पाटील, सचिव योगेश अमृतकर, राजेंद्र गिरासे उपस्थित होते.
तीन दिवस व्यवहार ठप्प
कामबंद आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीत शेतीमाल उघड्यावर पडून होता.
शुक्रवारी लाल मिरचीचे दिडशे वाहने भरून आली होती. लिलाव होत नसल्याने शेतकरी चिडले होते. त्यानंतर दुपारून लिलाव करण्यात आले.
आता मंगळवार, १ डिसेंबरपासून नियमित कामकाज सुरू होणार आहे.