शिवसेनेने झुंजवूनही भाजपने राखले तालुक्यावर वर्चस्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:28 PM2020-01-09T12:28:14+5:302020-01-09T12:28:21+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दहा गटापैकी सात गटांवर विजय मिळवीला असला तरी पंचायत ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दहा गटापैकी सात गटांवर विजय मिळवीला असला तरी पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी भाजपसह विरोधी पक्षांनाही कसरत करावी लागणार आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेचे धणुष्यबाण हाती घेवून निवडणुकीला सामोरे गेलेल्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आणखी मेहनत घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोन्ही नेत्यांचे विधानसभा निवडणुकीतील वेल्डींग राज्यातील सत्ता स्थापनेनंतर तुटले. परिणामी जिल्हा परिषदेवर आणि नंदुरबार पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. राष्टÑवादीने देखील चार गटात उमेदवार दिले, परंतु चारही ठिकाणी पराभव पत्करावा लागला.
काँग्रेस सोडून शिवधणुष्य हाती घेवून आपले वर्चस्व तालुक्यावर परिणामी पुन्हा जिल्ह्यावर स्थापीत करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकीय डावपेच आखले. तीन ठिकाणी शिवसेना उमेदवार न देता आपल्याच कार्यकर्त्यांना काँग्रेसची उमेदवारी देवून निवडून आणण्याचा प्रयत्न केला. पैकी एका ठिकाणी त्यांना यश आले. शिवनेसेनेचे तालुक्यात काहीही अस्तित्व नसतांना, धणुष्यबाण चिन्ह जनतेच्या मनात रुजलेले नसतांनाही आव्हान पेलून रघुवंशी यांनी तालुक्यात सर्वदूर शिवसेना पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दोन गटात आणि पंचायत समितीच्या सहा गणात आणि एक पुरुस्कृत उमेदवार अशा सात ठिकाणी त्यांनी उमेदवार निवडून आणले. पंचायत समितीत रघुवंशी गटाला गेल्या दोन पंचावार्षीकपासून बहुमत मिळविता आले नाही. गेल्या पंचवार्षीकच्या दुसऱ्या अडीच वर्षात त्यांच्या गटाची सत्ता आली असली तरी राष्टÑवादीच्या सदस्यांना फोडून ती स्थापन करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पंचायत समितीवर सत्ता स्थापन व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. परंतु आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी आपले एकहाती वर्चस्व कायम राखले. त्यांच्याच घरातील जिल्हा परिषदेत चार तर पंचायत समितीत दोन सदस्य निवडून आले आहेत. राष्टÑवादीचे तालुक्यातील उरले सुरले अस्तित्व देखील आता संपण्याच्या मार्गावर आहे. गटातील एक जागा येण्याची शक्यता असतांना ती देखील आली नाही. पंचायत समितीत देखील पक्षाला खाते उघडता आले नाही.
एकुणच पंचायत समितीत कुणालाही बहुमत मिळविता आले नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणेच नंदुरबार पंचायत समितीत देखील स्पर्धा होणार हे स्पष्ट आहे.
तालुक्यातील निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे गावीत परिवारातील चार सदस्य निवडून आले आहेत. गटातत चार तर गणात एक सदस्याचा समावेश आहे. अर्चना गावीत या गटातून आणि गणातूनही निवडून आल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीची सत्ता भाजपची आली तर सभापतीपदासाठी त्या गटाचा राजीनामा देवू शकतात.
शिवसेनेतर्फे निवडून आलेले अॅड.राम रघुवंशी हे उपाध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे वेळ आल्यास अध्यक्ष व उपाध्यक्ष देखील नंदुरबार तालुक्यातीलच राहण्याची शक्यता आहे.
यंदाच्या निवडणुकीत कुठलाही असा प्रभावी मुद्दा नव्हता. केवळ स्थानिक मुद्यांवर निवडणूक लढविली गेली.
भाजप आणि शिवसेनेत सरळ लढती झाल्या. परंतु काही ठिकाणी काँग्रेस व राष्टÑवादीनेही चांगली लढत देवून चुरस निर्माण झाली होती.
रनाळे गटातील विजयी उमेदवाराला अवघा ५१ मतांचा लीड मिळाला. या ठिकाणी राष्टÑवादीच्या उमेदवाराने १,७३३ मते घेतल्याने भाजप उमेदवाराला पराभव पहावा लागला.