चहा विक्रेत्याच्या संपर्कात आलेल्यांमध्ये धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:01 PM2020-07-03T13:01:30+5:302020-07-03T13:01:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून येथील प्रसिद्ध चहावाला कोरोना बाधीत आढळल्याने अनेकांना धडकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून येथील प्रसिद्ध चहावाला कोरोना बाधीत आढळल्याने अनेकांना धडकी भरली आहे. २८ जून रोजी संबंधित चहा विक्रेता पॉझिटीव्ह आला आहे. धुळे येथील कोरोना टेस्टींग लॅब बंद असल्याने मनुके व चहा विक्रेता या दोन्ही कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील २७ स्वॅब घेतले आहेत. त्यातील जवळच्या १३ लोकांचे अहवाल प्रलंबित असून या अहवालांचे अहवाल येण्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
या दुकानात दररोज चहा प्यायला जाणाऱ्यांनी धास्ती घेतली असून कोरोना लागण झाल्याने गोड लागणारी चहाला आता कडवटपणा आला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होईलच. परंतु त्यांच्या अहवालाने शहरात सध्यातरी चिंतेचे वातावरण पसरले आहे. धुळे येथील टेस्टींग लॅब बंद असल्यामुळे चार ते पाच दिवस उलटूनही त्यांच्या संपर्कातील एकही अहवाल प्राप्त झाला नसल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी या ठिकाणाहून चहा पिल्याने अशांमध्ये कमालीची भीती दिसून येत आहे.
शहरात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने एन्ट्री केली होती. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने त्वरित उपाययोजना करीत कडक लॉकडाऊन केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले होते. आता कोरोनापासून मुक्ती मिळालेल्या शहरात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील गणेशनगर भागातील २९ वर्षीय रुग्णवाहिका चालक कोरोना बाधीत आढळल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवालही पॉझिटीव्ह येत असल्याने हा विषय शहरासाठी गंभीर झाला आहे. शहरातील प्रसिद्ध चहा विक्री करणाºया व्यावसायिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कारण या चहावाल्याकडे दररोज शेकडो जण चहा पिण्यासाठी जात होते. यामुळे या आठवडाभभरात त्याच्याकडे ज्यांनी-ज्यांनी चहाचा आस्वाद घेतला आहे. अशांना आता कोरोनाची भीती बसली आहे. संपर्कात आलेल्यांना चांगलीच धास्ती बसली असून शहरात चहाची जोरदार चर्चा सुरू आहे.
शहरात कोरोनावरील अंकुश सैल झाल्याने प्रशासनातर्फे ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. अचानकपणे जिल्ह्यात व शहादा तालुक्यात कोरोनाने डोके वर काढल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहादा शहरात कोरोना रुग्ण सापडत असताना शहरातील विविध भागात कोणतीही काळजी न घेता नागरिक मोकळेपणाने फिरत आहेत. काही काम नसताना शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसते. शहरातील विविध भागात लॉरीधारक विक्रेते, लहान-मोठे व्यावसायिक कोणत्याही प्रकारे नियम पाळत नसल्याचे नाहीत. आपल्या सामानाची विक्री करताना शासनाने ठरवून दिलेले नियम पाळण्याची शक्ती असताना मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंग न ठेवता आपल्या साहित्याची विक्री करतात. एकीकडे प्रशासन रुग्ण वाढू नये म्हणून युद्धपातळीवर उपाययोजना करीत असताना असे काही व्यवसायिक कोरोना वाढवण्यास मदत करत असल्याचे दिसून येत आहेत.
प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक व व्यवसायिकांनी करावे. ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवावेत. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-डॉ.राहुल वाघ,
मुख्याधिकारी, शहादा पालिका.
प्रशासनाच्या वतीने कोरोना अटकाव करण्यासाठी उपाययोजना सुरू असून नागरिकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. सोशल मिडीयातून कोरोनासंदर्भात चुकीची माहिती प्रशासनाच्या नावाचा वापर करून पसरवू नये. असे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.
-डॉ.चेतन गिरासे,
प्रांताधिकारी तथा इसिडेंड कमांडर.