स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेत श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:21+5:302021-09-22T04:34:21+5:30
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशनतर्फे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दिनांक १५ सप्टेंबर ...
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशनतर्फे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की, स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता, सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून जिल्हा परिषद आवारात स्वच्छता करावी. तसेच दर शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी न चुकता श्रमदान करून परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान करावे. प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या कार्यालयातील स्वच्छतेसाठी आग्रही राहून कार्यालये नियमित स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही गावडे यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी शपथ दिली. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानात सहभाग नोंदवून जिल्हा परिषद आवारात स्वच्छता केली. प्राथमिक शिक्षण अधिकारी राहुल चौधरी, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एल. बावा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा कक्षाचे युवराज सूर्यवंशी यांनी केले. आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील यांनी मानले.