शहाद्यात आठ जोडप्यांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:21 PM2018-03-29T12:21:45+5:302018-03-29T12:21:45+5:30
गुजर नाभिक समाज : जोडप्यांनी केले सामूहिक वृक्षारोपण; पंच मंडळाचा उपक्रम
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 29 : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्यावतीने शहादा येथे बुधवारी पाचवा सामूहिक विवाह सोहळा झाला. यात आठ जोडण्यांचे शुभमंगल झाले आहे.
समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्या वतीने पाचवा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन बुधवारी रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता शहादा येथील खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजराथ व मध्यप्रदेशातील सीमेवर्ती भागात गुजर नाभिक समाजाचे वास्तव्य आहे.
गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्या वतीने हा पाचवा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी आठ जोडप्यांचे विवाह थाटात लावण्यात आले. या विवाह सोहळ्याची नोंदणी नाममात्र शुल्क घेऊन करण्यात आली आहे. या सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे हा सोहळा सामूहिक असला तरी यात प्रत्येक जोडप्याचे लग्न हे स्वतंत्र मंगलाष्ट व पारंपारिक प्रथा परंपरेप्रमाणेच लावण्यात आले.
लग्न मंडपात प्रत्येक जोडप्याला स्वतंत्र स्टेजवर विशिष्ट जागा करण्यात आली होती. वधूवारांच्या व्यासपीठासमोर त्याच दाम्पत्यांच्या नातलग व महिला पुरूषांसाठी अर्थात व:हाडींसाठी बसण्याची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली होती. सामूहिक विवाहाच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी नऊ वाजता उपवरांची मिरवणूक अंबिका माता मंदिर, खेतिया रोड पासून ते खरेदी विक्री संकुल, दोंडाईचा रोडर्पयत काढण्यात आली.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजराथ व मध्यप्रदेशातील सुमारे तीन ते पाच हजार समाजबांधव उपस्थित होते. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, आमदार अमरिशभाई पटेल, यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तर व्यासपीठावर माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, , नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, सातपुडा सातपुडा शिक्षण संस्थेचे विभागीय सचिव संजय जाधव, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हाईस चेअरमन जगदीश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, रमेशचंद्र जैन आदी उपस्थित होते. याप्रसंगी आठही नवदापत्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.अनिल साळुंखे यांनी केले. विवाह सोहळा यशस्वितेसाठी समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.