कांदा व कापूस उत्पादनात घट येणार असल्याचे चिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:25+5:302021-09-21T04:33:25+5:30
शहादा तालुक्यासह असलोद-मंदाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड यावर्षी करण्यात आलेली आहे. या पिकावर बियाणे, फवारणीसह ...
शहादा तालुक्यासह असलोद-मंदाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड यावर्षी करण्यात आलेली आहे. या पिकावर बियाणे, फवारणीसह मशागतीसाठी भरपूर पैसा शेतकऱ्यांनी खर्च केला. पीक जोमाने दिसू लागले. परंतु गेल्या १५ दिवसांत झालेल्या पावसामुळे कांदा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने हे पीक वाया जात आहे. त्यामुळे त्याच्यावर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक पूर्णता सुकून जात असल्याने कांदा पिकाच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कसेबसे महागडी बियाणे व मशागतीचे काम करून पिकाला वाचवले होते. परंतु पावसाने त्याच्यावर पाणी फिरल्याने शेतकरी कचाट्यात सापडला आहे. तसेच अति पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कापूस पीकदेखील मोठ्या प्रमाणावर वाया गेले आहे. कांदा व कापसाच्या नुकसान झालेल्या ठिकाणी प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.