पुतळा स्थलांतरासाठी निघाला मूक मोर्चा
By admin | Published: March 2, 2017 12:46 AM2017-03-02T00:46:45+5:302017-03-02T00:46:45+5:30
अवैध धंद्यांचा विळखा : महाराणा प्रताप यांचा पुतळा, प्रशासनाला निवेदन
नंदुरबार : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा शहरातील इतर भागात स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी क्षत्रिय महाराणा प्रताप युवा मंचतर्फे नंदुरबारात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकºयांतर्फे निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबारातील बसस्थानक आवारात महाराणा प्रताप यांचा पुतळा १२ वर्षांपूर्वी बसविण्यात आला आहे. या पुतळ्याच्या परिसरात अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. परिणामी पुतळा त्या ठिकाणाहून सन्मानाने स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय क्षत्रिय महाराणा प्रताप युवा मंचतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाला दुपारी साडेअकरा वाजता नाट्यमंदिरापासून सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यावर तेथे शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराणा यांचा पुतळा कुंटणखान्यासमोर आहे. त्या परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. परिसरात अवैध दारू विक्री होत असल्यामुळे पुतळा परिसरात नेहमीच अनेकजण दारू पित बसतात. रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा या ठिकाणी नेहमीच खच पडलेला असतो. काही समाजकंटकांकडून या अवैध धंद्यांना संरक्षण पुरविले जाते. या भागात रात्रीच्या वेळी नेहमीच लूटमार केली जाते. त्यावेळी या संदर्भात उल्लेख करतांना महाराणा प्रताप पुतळा परिसर असा उल्लेख व नोंद अधिकृतरीत्या केली जाते. यामुळे महाराणा यांची एकप्रकारे विटंबनाच केली जाते.
या ठिकाणी बसस्थानक असल्याने रात्री-बेरात्री प्रवासी आल्यावर त्यांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. याशिवाय शाळा-महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांचा रस्तादेखील याच भागातून असल्यामुळे त्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.
या सर्व कारणांमुळे महाराणा प्रताप यांचा बसस्थानकाजवळील पुतळा स्थलांतरित करून वाघेश्वरी चौफुली येथील सर्कलमध्ये स्थापित करावा असेही या निवेदनात शेवटी नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर मुकेश राजपूत, मोहितसिंग राजपूत, जितेंद्र राजपूत, संग्राम राजपूत, चेतन राजपूत, वाल्मीक राजपूत, जयपाल राजपूत, विजयसिंग गिरासे, रोहित राजपूत, सागर राजपूत, हेमंत राजपूत, शैलेश राजपूत, महेंद्र राजपूत यांच्यासह समाज बांधवांच्या सह्या आहेत.
दरम्यान, मोर्चाला क्षत्रिय राणा राजपूत समाज सेवा समिती, दोंडाईचा येथील भाजप नगरसेवक, भाजप युवा मोर्चा, म.फुले समता परिषद, राष्टÑवादी युवक काँग्रेस, एकलव्य आदिवासी युवा संघटना, समस्त माळी पंच आदी संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
मोर्चा दरम्यान शहर वाहतूक शाखेतर्फे रहदारीचे नियोजन करण्यात आले होते. शहर पोलिसांतर्फेदेखील मोर्चादरम्यान बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था...
४भर उन्हात मोर्चा निघाल्याने मोर्चेकºयांना पिण्याच्या पाण्याचे पाऊच वाटप करण्यात येत होते. एका मालवाहतूक करणाºया वाहनात पाण्याचे पाऊच ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोर्चाच्या अडीच ते तीन किलोमीटर अंतरात हजारो पाणी पाऊच वाटप करण्यात आले.
स्वयंसेवकांची शिस्त
४ मूक मोर्चा असल्यामुळे केवळ हातात मागण्यांचे फलक घेऊन समाज बांधव सहभागी झाले होते. काहींनी खास मोर्चासाठी तयार केलेले काळे टीशर्ट परिधान केले होते. काहींनी दंडाला काळी पट्टी बांधली होती. मोर्चादरम्यान पाण्याचे रिकामे पाऊच रस्त्यावर पडून राहू नये म्हणून नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांनी त्याची स्वच्छता केली.
प्रशासनातर्फे काळजी...
४ कडकडीत उन्हात मोर्चा निघाल्याने व मोर्चाचे एकूण अंतरदेखील जास्त असल्यामुळे या दरम्यान कुणाला उष्माघात किंवा इतर त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत होती. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने मोर्चाच्या मागे रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली होती.