शहाद्यात कोरोनाचे सहा रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:57 PM2020-07-20T13:57:39+5:302020-07-20T13:57:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा : गेल्या २४ तासात शहरातील गरीब-नवाज कॉलनीसह अन्य भागात रहिवासी असलेल्या सहा जणांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा : गेल्या २४ तासात शहरातील गरीब-नवाज कॉलनीसह अन्य भागात रहिवासी असलेल्या सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, तिघांचा मृत्यू झाला असल्याने तालुक्यात मृतांची संख्या आठ झाली आहे.
जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून शहादा शहरात १८ जुलैला सायंकाळी नव्याने चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात गरीब-नवाज कॉलनीतील दोन, खेतिया रोड परिसरातील एक तर बेलदार गल्लीतील एका रुग्णाचा समावेश आहे. पालिका व प्रशासनाने कोरोना बाधित आढळलेला परिसर सील करून हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयितांचे सर्वेक्षण केले जात असून त्यातील २३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मोहिदे त.श. येथील विलगीकरण कक्षात यातील काहींना दाखल करण्यात आले आहे.
१९ जुलैला दुपारी दीड वाजता प्रशासनाने जाहीर केल्यानुसार शहरातील गरीब-नवाज कॉलनी परिसरातील २८ वर्षीय पुरुष, संभाजीनगर परिसरातील ५४ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. रविवारी दिवसभरात शहरातील रुग्णसंख्या दोनने वाढली आहे तर शनिवारी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका ७४ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली. हा व्यक्ती मुंबई येथे उपचारासाठी गेला होता व तेथे त्याला संसर्ग झाला असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. १८ जुलैला सायंकाळी वृंदावननगर परिसरातील बाधित रूग्णाचे निधन झाले आहे. गेल्या २४ तासात तीन बाधीत दगावल्याने तालुक्यातील बाधित मयत रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
दरम्यान, श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी खान्देशची कुलदेवता कानुबाई मातेची स्थापना व उत्सव साजरा करण्यात येतो व सोमवारी कानुबाईचे नदीपात्रात विसर्जन केले जाते. त्याचप्रमाणे दशा मातेची स्थापना तालुक्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. सुमारे १० दिवस हा उत्सव चालतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समूह संसर्ग टाळण्यासाठी हा उत्सव कौटुंबीक व मर्यादित स्वरूपात साजरा करावा. बकरी ईदचा सणही शासन निर्देशानुसार साजरा करावा. तसेच पुणे-मुंबईसह अन्य शहरातून विना पास दाखल झालेल्यांची माहिती प्रशासनास देण्यात यावी. अन्यथा कोविड-१९ नियमावलीनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा इन्सिडेंट आॅफिसर तथा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिला आहे.