अडीच हजार अंगणवाडींना स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:33 AM2019-03-07T11:33:06+5:302019-03-07T11:33:27+5:30

दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची राहील अडचण

Smartphones for 2,500 Aanganwadi | अडीच हजार अंगणवाडींना स्मार्टफोन

अडीच हजार अंगणवाडींना स्मार्टफोन

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी कर्मचारींना स्मार्ट फोन दिला जाणार असून त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल हा आॅनलाईन भरावा लागणार आहे. यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसिकरण याची माहिती तात्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे. दरम्यान, ग्रामिण भागात कनेक्टिीव्हिटीची समस्या लक्षात घेता हा प्रयोग किती आणि कसा यशस्वी होतो याकडेही लक्ष लागून आहे.
सर्वच क्षेत्रात आॅनलाईन कामकाजाची सुरुवात झाली आहे. पूर्वी संगणकावर काम करून त्याचा ई-मेल पाठवून आॅनलाईन काम केले जात होते. परंतु आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर आॅनलाईन कामकाज आले आहे. त्यात आता अंगणवाडी देखील सुटलेल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी बाईला आता स्मार्टफोन हातात घेवून कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात लवकरच असे स्मार्ट फोन वाटप केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात आली.
अडीच हजार अंगणवाडी
जिल्ह्यात जवळपास दोन हजार ४४० अंगणवाडी आहेत. अनेक अंगणवाडी या दुर्गम भागात भरत असतात. काही ठिकाणी इमारत नसल्यामुळे कुडाच्या घरात किंवा अंगणवाडी सेविकेच्या अंगणात अथवा ग्रामपंचायत कार्यालयात त्या भरवाव्या लागतात. यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असते. यामुळे पुरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे यासह इतर बाबींना अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागते.
अहवाल देण्याची कसरत
अंगणवाडी सेविकांना गरोदर माता, बालकांचे वजन, लसिकरण, पुरक आहार यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल त्यांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. त्यासाठी संबधीत ठिकाणी जावे लागते. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागते. आधीच कमी मानधन त्यात असा अवांतर खर्च त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक फरफट देखील होत असते.
आता स्मार्ट फोन
अंगणवाडी सेविकांना आता स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. प्रत्येक अंगणवाडीला एक असे एकुण दोन हजार ४४० स्मार्ट फोन पुरविण्यात येतील. त्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे. रजिस्टरऐवजी आता या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन मध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जातील. परिणामी रजिस्टरवरील दैनंदिन नोंदीचे काम संपुष्टात येणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांनाही दिलासा मिळणार आहे.
लवकरात लवकर स्मार्ट फोन कसे उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापुराव भवाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद वळवी यांनी सांगितले.

Web Title: Smartphones for 2,500 Aanganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.