सापाला पकडून केली जनजागृती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:13 PM2019-12-08T12:13:49+5:302019-12-08T12:14:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कलसाडी येथील जि.प. शाळेतील महिला शिक्षिकांनी सर्पमित्राच्या सहाय्याने शाळेतील साप जीवंत पकडून त्याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील कलसाडी येथील जि.प. शाळेतील महिला शिक्षिकांनी सर्पमित्राच्या सहाय्याने शाळेतील साप जीवंत पकडून त्याला जीवदान तर दिलेच त्यासोबत विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीही घालवली.
कलसाडी शाळेला चारही बाजूंनी संरक्षण भिंत आहे. तरीही १० ते १५ दिवसांपासून एक ‘पाणदिवळ’ जातीचा चार-साडेचार फुटाचा साप शाळेच्या परिसरात दिसायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा साप १५ दिवसात तीन ते चारवेळेस दिसला आणि लगेच कुठेतरी लपून बसायचा. शनिवारी हा साप पुन्हा शाळेच्या मागच्या बाजूला विद्यार्थ्यांना दिसला. मुख्याध्यापक रजेवर असल्याने विद्यार्थ्यांनी उपशिक्षिका स्नेहल सर्जेराव गुगळे यांना साप निघाल्याचे सांगितले. गुगळे यांनी तात्काळ स्वत: सापाच्या दिशेने जात मीना पाटील व निर्मला सामुद्रे यांनाही बोलावले. या सापावर आता आपण व्यवस्थित लक्ष ठेवू आणि सर्पमित्रांच्या सहाय्याने कोणत्याही परिस्थितीत आपण याला आज जीवंत पकडू व विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कोणत्याही परिस्थितीत घालवूच, असा या महिला शिक्षिकांनी निश्चत केला. याआधीही दोनवेळा त्या सापाला जीवंत पकडण्याचा प्रयत्न केला होता पण तो फटीत घुसून जायचा आणि कुठेतरी लपून बसायचा. स्नेहल गुगळे यांनी याआधी सर्पमित्र राजेश ठोंबरे यांच्याकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. परंतु आपले १० महिन्याचे लहान बाळ सोबत असल्याने त्यांनी यावेळेस स्वत: साप न पकडता त्यांच्या संपर्कातील शहादा येथील सर्पमित्र राहुल कोळी यांच्याशी फोनवर संपर्क करून त्यांना कलसाडी जि.प. शाळेत बोलावले. शहाद्याहून कलसाडीला सर्पमित्र येईपर्यंत जवळपास २० ते २५ मिनिटे या महिला शिक्षिका सापावर लक्ष ठेवूनच होत्या. सर्पमित्र आल्यावर काही वेळातच सापाला पकडून त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्नेहल गुगळे यांनीही स्वत: साप हाताळत तो पाणदिवड जातीचा बिनविषारी परंतु अतिशय चपळ व रागीट साप असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्याला कुठेही व कधीही साप आढळून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना फोन करून बोलवावे मग ते साप पकडून पुढे पुन्हा एखाद्या शेतात सोडून देतात. त्याला स्पर्श झाल्याशिवाय किंवा आपण त्रास दिल्याशिवाय तो आपल्याला काहीही करत नाही, अशी माहिती मीना पाटील यांनी दिली. निर्मला सामुद्रे यांनीही साप हा शेतकऱ्याचा मित्र असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. कोकणी, कलाल सर व गांगुर्डे यांनी साप पकडण्याची मोहीम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले. सापाबद्दलची सर्व माहिती जाणून घेतल्यावर हा साप एक किलोमीटर अंतरावरील शेतातील पाण्यात सोडून देण्यात आला. महिला शिक्षिकांच्या या धाडसाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे.