तथाकथित महाराजामुळे तोरणमाळची शांतता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:10 PM2017-11-07T12:10:01+5:302017-11-07T12:10:01+5:30
गोरक्षनाथ मंदिरावर दावा : ग्रामस्थांची तक्रार, पोलीस अधीक्षकांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ मंदिर व मंदिराच्या संपत्तीवर मालकी हक्काचा दावा सांगणा:या तथाकथीत महाराजामुळे तोरणमाळ येथील शांतता धोक्यात आली आहे. मंदिराची तोडफोड झाल्याचा कांगावा करणा:या या महाराजाच्या कृत्यामुळे त्यात भर पडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी तोरणमाळ येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या वेळी ग्रामस्थांनी या महाराजाची चौकशी करून त्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली.
तोरणमाळ येथे गोरक्षनाथांचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची देखभाल व सेवा अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ करतात. मंदिराच्या ट्रस्टची नोंददेखील आहे. मात्र त्याबाबत न्यायालयीन वाद आहे. एक ते दीड वर्षापासून अचानक एका तथाकथीत महाराजाने या मंदिरात आपले बस्तान मांडले आहे. तो कुठून आला, कशासाठी आला याबाबत कोडे ग्रामस्थांनाही उलगडलेले नाही. तो मंदिर व त्याची संपत्तीचा मालक असल्याचे सांगून ग्रामस्थांना धमकावत आहे. या तथाकथीत महाराजामुळे तोरणमाळ येथे अनेकदा लहान-मोठे वादही उद्भवले असल्याने येथील शांतता धोक्यात आली आहे. ग्रामस्थांनी त्याच्याविरोधात म्हसावद पोलिसांत तक्रारही दिली आहे. तरीही या महाराजाचे उपद्व्याप सुरूच आहेत. अज्ञात लोकांनी मंदिराची तोडफोड केल्याची तक्रार ‘त्या’ महाराजाने पोलिसांत केल्याने वादात अधिकच भर पडली आहे. मात्र मंदिर तोडून नवीन बांधण्याचे आमिष दाखवून त्यानेच मंदिराची तोडफोड केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दखल घेत तोरणमाळ येथे भेट देऊन माहिती घेतली. मंदिर परिसराचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थ व त्या महाराजाची बैठक घेतली. बैठकीत पोलीस पाटील ओलसिंग नाईक, जीवन रावताळे, करमसिंग चौधरी, सुशांत चव्हाण, हेमराज तडवी, दिलीप रावताळे, विक्की चव्हाण, सुरेश नाईक, पहाडसिंग नाईक, विजय रावताळे यांच्यासह सुमारे 150 ग्रामस्थांनी तथाकथित महाराजामुळे उद्भवत असलेल्या तक्रारींचा पाढा वाचला. एक-दीड वर्षापूर्वी तो येथे कुठून व कशासाठी आला त्याची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करावी व तोरणमाळ येथून त्याची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली. अन्यथा कुठलाही अनर्थ घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. बैठकीचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात आले असून या तथाकथीत महाराजाविरोधात ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे.