ग्रामविकासाच्या चळवळीला दिशा देणारा सोनपाडाचा ‘मानसिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:54 AM2020-01-12T11:54:01+5:302020-01-12T11:54:08+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :गावाच्या रस्त्याभोवती साचणारे उकिरडे, कचरा यामुळे आरोग्याला घातक ठरलेल्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :गावाच्या रस्त्याभोवती साचणारे उकिरडे, कचरा यामुळे आरोग्याला घातक ठरलेल्या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी सोनपाडा, ता.नवापूर येथील मानसिंग वळवी व त्यांच्या साथीदारांनी सुरू केलेली चळवळ ही निश्चितच ग्रामिण युवकांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे. या उपक्रमातून गावात स्वच्छता तर झालीच पण अनेकांना उद्योग-व्यवसायही मिळाल्याने समृद्धीचा नवा मार्ग त्यांनी उभा केला आहे.
सोनपाडा हे १०० टक्के आदिवासी वस्तीचे गाव. या गावात कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील तज्ज्ञांनी भेट देवून शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेतला होता. त्यावर प्रभावीत होऊन मानसिंग एनथा वळवी व त्यांच्या काही सहकार्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला आणि काय करता येईल यावर चर्चा केली. त्यातूनच गावाच्या रस्त्याभोवती उकीरडे व कचरा जास्त असल्याचे मानसिंग वळवी यांनी सांगितले.
त्यातूनच गांडूळ खत निर्मितीची संकल्पना पुढे आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुरुवातीला केवळ पाच बेडचा गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी गावातील शेतकऱ्यांचे शेनखत विकत घेतले व रस्त्याभोवती साचलेला कचरा गोळा केला. पहिल्या वर्षाचा यशस्वी प्रयोगानंतर त्याचा विस्तार केला.
गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यावर्षी १०९ टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. गावातील शेतकºयांचे शेनखत त्यासाठी घेतले जाते. याच बरोबर बचत गटाच्या माध्यमातून दाळमिळही सुरू केली आहे. त्याला आता मुंबईतही मागणी वाढल्याने मुंबईचा लोकांचा मागणीच्या धरतीवर या प्रकल्पाला नवा आकार देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
गांडूळखत निर्मितीमुळे शेती विकासालाही चालना मिळाली आहे. यासंदर्भात मानसिंग वळवी यांनी त्यांच्या स्वत:च्या एक एकर शेतात प्रयोग केला. त्यातील यशानंतर हळूहळू त्यांनी आता ३५ एकर क्षेत्र भाड्याने घेतले. त्यात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. विशेषत: भात, तूर, ज्वारीचे पीकं घेतली जात असून या सेंद्रीय धान्याला मागणीही वाढली आहे.
मानसिंग वळवी यांचे प्रयोग पाहून गावातील अनेक शेतकरी आता सेंद्रीय शेतीचे प्रयोग करू लागले आहेत. त्यामुळे हे गाव प्रयोगशील गाव म्हणून जिल्ह्यात नावारुपास येवू पहात आहे. तांदूळ महोत्सवात या गावाच्या तांदुळाला विशेष मागणी असते.
प्रयोगशील गाव... मानसिंग वळवी व त्यांच्या पाच सहकार्यांनी बचत गटाच्या माध्यमातून गावात दाळमिल, सेंद्रीय तांदूळ, गांडूळखत निर्मिती आणि सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरू केले आहेत. त्यांचा आदर्श घेत गावातील ४१ शेतकºयांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग यंदा राबविले आहेत. पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश देत गावात स्वयंरोजगार आणि व्यवसायाला गती मिळाल्यामुळे गावात समृद्धीचा नवा मार्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे गावही बदलू लागले असून अनेकजण या गावातील प्रयोग पहाण्यासाठी व माहितीसाठी येत आहेत.