स्ट्रेचरला सोसवेना रुग्ण भार शेवटी नातेवाईकच देतात आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:50 PM2021-01-29T12:50:28+5:302021-01-29T12:50:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अपघात किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आणले गेल्यानंतर कक्षात नेण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अपघात किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आणले गेल्यानंतर कक्षात नेण्यासाठी लागणा-या स्ट्रेचरची परिस्थितीच नाजूक असल्याचे दिसून आले आहे. यातून कर्मचारी आणि रुग्णासोबतचे नातलग यांनी हातभार लावल्यावर रुग्ण पुढील उपचारासाठी रवाना होवू शकतो.
कोरोना महामारीपूर्वी साहित्य खरेदी करण्याकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सातत्याने समोर येत होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दर दिवशी किमान २०० जण विविध कारणाने दाखल होतात. यातील काही अपघात तर काही गंभीर आजारी असल्याने याठिकाणी येतात. रुग्णवाहिकेतून येथपर्यंतच प्रवास सुकर असला तरी रुग्णालय आवारात आल्यानंतर मात्र जखमी किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला योग्य तेस्ट्रेचर मिळणे कठीण झाले असल्याचे केलेल्या पाहणी दरम्यान समोर आले. रुग्णालयाचे कर्मचारी किंवा चालक मदतीला येत असले तरीही बहुतांश वेळा सोबत आलेल्या नातलगांनाच रुग्णाला स्ट्रेचरवर टाकून न्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे.
रुग्णाला याठिकाणी घेवून आल्यानंतर रुग्णवाहिकेतून उतरवण्यासाठी कसरत करावी लागली. आरोग्य कर्मचारी न आल्याने मित्रांसह एकदोन नातेवाईकांना बोलावून घेत स्ट्रेचरवर टाकले. चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर उपलब्ध झाले पाहिजेत.
-राकेश पावरा,
रुग्णाचा नातेवाईक,
मी माझ्या गावातील एकाला तपासणीसाठी आणले होते. त्याला चालता येत नसल्याने व्हीलचेअर मिळाली नाही. स्ट्रेचरही मिळत नसल्याने त्यांना हातात हात धरुन आधार देत एक्सरे रुम ते वरच्या मजल्यापर्यंत घेवून गेलो.
-कर्मा पाडवी,
रुग्णासोबतचे नातेवाईक,
जिल्हा रुग्णालयात सध्या चांगल्या दर्जाचे स्ट्रेचर आहेत. रुग्णवाहिकेतून एखादा रुग्ण आल्यास तातडीने त्याला संदर्भित केलेल्या कक्षात दाखल करण्याची कारवाई होते. अशावेळी परिचारिका, परिचर आणि शिपाई मदतीला जातात. तसे आदेश करण्यात आले आहेत. काही वेळेस कर्मचारी इतर ठिकाणी असल्यास अडचणी येतात. नवीन साहित्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
-डाॅ. के.डी.सातपुते,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.