दक्षिण काशीला लाभणार नवा ‘लूक’

By admin | Published: June 12, 2017 05:19 PM2017-06-12T17:19:37+5:302017-06-12T17:19:37+5:30

पर्यटन विभागाची मंजुरी : विकासासाठी साडेआठ कोटींचा निधी

South Kashi will get new 'Look' | दक्षिण काशीला लाभणार नवा ‘लूक’

दक्षिण काशीला लाभणार नवा ‘लूक’

Next

 रमाकांत पाटील/ ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.12 - संपूर्ण भारतात दक्षिणकाशी म्हणून परिचित असलेल्या पुरातन नगरी श्रीक्षेत्र प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन विभागाने साडेआठ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच  या परिसराला  नवा ‘लूक’ लाभणार आहे.
प्रकाशा हे गाव प्रतीकाशी म्हणून ओळखले जाते. त्याबाबतच्या अनेक पौराणिक कथाही प्रचलित आहेत. इतिहासातही हे गाव प्राचीन असल्याचे संदर्भ सापडतात. पुरातत्वज्ञ डॉ.थापर, व्ही.टी. आठवले, के.रमेशराव व आर.शाही यांनी 1955 मध्ये प्रकाशा येथे तापी-गोमाईच्या संगमावर केलेल्या उत्खननात याठिकाणी सापडलेल्या पुरातन वस्तूंमुळे त्यांना याठिकाणी दख्खन आणि मध्य भारतीय संस्कृतीचा मिलाप झालेला दिसून आला. तसेच हरप्पन संस्कृतीच्या वसाहतीही आढळून आल्या. अर्थातच येथील प्राचिनतेचा इतिहास जसा समृद्ध आहे. या ठिकाणी असंख्य पुरातन मंदिरे असून देशभरातील भाविक येथे येत असतात. विशेषत: या भागातील केदारेश्वर मंदिराजवळील पुष्पदंतेश्वराचे मंदिर हे देशातील एकमेव मंदिर मानले जाते. त्यामुळे चारधाम यात्रा करणा:या भाविकांची यात्रा येथे आल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी बाराही महिने भाविकांचा ओघ सुरू असतो. तथापि, त्या तुलनेत परिसराचा विकास मात्र झालेला नाही. याच मंदिराजवळ तापी नदीवर बॅरेज प्रकल्प झाल्याने परिसराचे सौंदर्य वाढले आहे. आता पर्यटन विभागाने या भागाच्या विकासासाठी विशेष लक्ष घातले आहे. 
विशेषत: जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याचकडे पर्यटन मंत्रालय असल्याने त्यांनी त्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार केदारेश्वर परिसराच्या विकासासाठी एक विशेष आराखडा तयार करण्यात आला होता. त्याला पर्यटन विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. साधारणत: साडेआठ कोटी रुपये खर्च त्यावर होणार आहे. त्यामुळे हा परिसर अधिकच सुशोभित होणार आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची संख्याही वाढणार आहे.

Web Title: South Kashi will get new 'Look'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.