कापणीपूर्वी सोयाबीन दर पडले; अन् शेतकऱ्यांचे गणित बिघडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:14+5:302021-09-27T04:33:14+5:30
नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार ...
नंदुरबार : कापणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात साेयाबीन दरांनी ८ हजारांची उसळी घेतली होती. यामुळे यंदा सोयाबीन तारून नेणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच सोयाबीनचे दर पडण्यास सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्रत्येक दिवशी दर कमी होत असल्याने शेतकरी बांधवांच्या चिंता वाढत आहेत.
कमी वेळेत अधिक उत्पादन मिळत असल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी ३० हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा केला आहे. त्याची कापणी काही दिवसात सुरू होणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी साेयाबीनचे दर ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे हवा बाजारात निर्माण झाली होती. परंतु बाजारातील दरवाढीची हवा निघून गेली असून ८ हजारांचा दर थेट साडेचार हजारांवर आल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.
सोयाबीनवर माझ्यासह परिसरातील सर्वच शेतकरी बांधवांची भिस्त आहे. बाजारात दर १० हजारापर्यंत पोहोचल्याचे ऐकून होतो. बाजारातील दर पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करावा, यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान टळेल.
- विलास चाैधरी, शेतकरी, माेड
यंदा लांबलेला पाऊस, दुबार पेरणी यामुळे सोयाबीनसाठीही खर्च केला होता. यात पावसामुळे उत्पादन खराब झाले आहे. परंतु दर चांगले असल्याने खर्च वसूल होणार अशी शक्यता होती. परंतु दरांमध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे.
- दिलीप पाटील, मोड, ता. तळोदा.
दरम्यान, याबाबत शहादा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत चाैकशी केली असता, दरांमधील चढ-उतार ही बाजार भावानुसार होणारी प्रक्रिया असल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाला मिळालेला भाव हा त्यावेळच्या दरांनुसार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत साेयाबीनचे दर स्थिर असून दरांमध्ये चढ-उतार होणे सुरूच राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये, असे व्यापारी सांगत आहेत.