सभापती निवडीत भाजपाला मदत करणाऱ्यांची चौकशी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:40 PM2020-01-29T12:40:40+5:302020-01-29T12:40:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नंदुरबार जिल्हा परिषदेत सभापती निवडीप्रसंगी घडलेल्या प्रकारासोबत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नाही़ परंतू विरोधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नंदुरबार जिल्हा परिषदेत सभापती निवडीप्रसंगी घडलेल्या प्रकारासोबत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नाही़ परंतू विरोधी भाजपाचा सभापती निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या ज्या सदस्यांनी मदत केली त्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री अॅड़ के़सी़पाडवी यांनी तळोदा येथे दिला आहे़
तळोदा पालिकेने आदिवासी विकास विभागाच्या निधीतून तयार केलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी जिल्हा परिषदेत घडलेल्या प्रकारावर भाष्य केले़ यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड़ सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजीमंत्री अॅड़ पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, पालिका प्रतोद संजय माळी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा उपस्थित होते़
कार्यक्रमात बोलताना अॅड़ पाडवी यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांची निवड सोमवारी करण्यात आली़ या वेळी भाजपच्या सदस्याची सभापती पदावर निवड करण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांनी मदत केली़ या संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन काँग्रेसचा कुठलाही सदस्य दोषी आढळल्यास त्याच्या कारवाई करण्यात येईल़
तळोदा पालिका ही सर्वात जुनी आहे़ त्यामुळे कोणतेही राजकारण न करता, विकासासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, पालिकेने तसे प्रस्ताव द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले़ शेवटी बोलताना अॅड़ पाडवी यांनी आदिवासी विकास विभागातील बंद पडलेली ठक्कर बाप्पा योजनाही सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप उदासी यांनी केले़
पालिकेने आदिवाासी विकास विभागाच्या निधीतून शहरात हे सव्वा कोटी रुपयांच्या खर्चाचे भवन बांधले आहे़ त्याचे उद्घाटन पालकमंत्री अॅड़ पाडवी यांनी केले़ कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते़ पालिकेच्या या कार्यक्रमात पाच वर्षानंतर भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकाच मंचावर दिसल्याने चर्चा रंगत होत्या़