तळोदा ‘बंद’ला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:21 PM2018-01-22T12:21:40+5:302018-01-22T12:21:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील दहावीत शिकणा:या आदिवासी विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यासाठी येथील आदिवासी युवा शक्ती या संघटनेतर्फे शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देवून रविवारी शहरातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे आपापली दुकाने बंद ठेवून शांततेत बंद पाळला. या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रशासनास निवेदन देण्यात आले होते.
अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात दहावीत शिकणारी विद्यार्थिनी जागृती नामदेव पावरा या विद्यार्थिनीने गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र तिचा मृत्यू संशयास्पद झाला आह. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करावी यासाठी येथील आदिवासी युवा शक्तीच्या पदाधिका:यांनी रविवारी बंदची हाक दिली होती. त्यांच्या आवाहनास शहरवासियांनी प्रतिसाद देवून व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
या बंद दरम्यान, शहरातील मेनरोड, भाजी मार्केट, बसस्थानक परिसर, स्मारक चौक व गजबजलेल्या परिसरात अत्यंत शुकशुकाट दिसून आला होता. एक दिवस आधीच बंदची बातमी ग्रामीण खेडय़ांमध्ये पोहोचल्यामुळे ग्रामीण जनतेनेही शहराकडे पाठ फिरविली होती. बसस्थानकातदेखील अत्यंत तुरळक गर्दी होती. रविवार असल्यामुळे शहरातील शैक्षणिक संस्था आधीच बंद होत्या. बंद दरम्यान चोख बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा होता. दुपारी चार नंतर भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या लॉ:या लावल्या होत्या. एकूणच बंद शांततेत पार पडला आहे.
दरम्यान, या घटनेची चौकशी करण्याचे निवेदन आदिवासी युवा शक्तीचे अध्यक्ष विनोद माळी, उपाध्यक्ष विवेक पाडवी, अजरुन पाडवी, उत्तम वळवी, सागर पाडवी, अक्षय पाडवी, चेतन शर्मा, अजय धानका, नागेश पावरा, ईश्वर गोसावी, करण पाडवी, कृष्णा धानका, श्रावण तिजबिज, सुनील खैरनार, दाजू चव्हाण, दिलीप वसावे, श्रीकांत पाडवी, योगेश पाडवी आदींनी दिले.
आदिवासी कर्मचारी फेडरेशन
अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या मृत्यूस विद्यालय प्रशासन जबाबदार असून सदर विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया आदिवासी कर्मचारी एम्प्लाईज फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. याबबाबत शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदन देऊन ते राज्यपालांना पाठविण्यात आले आहे. फेडरेशनचे जिल्हा सचिव सुनील सुळे, अॅड.चंपालाल भंडारी, अॅड.कुवरसिंग वळवी, करणसिंग तडवी, भुरा पवार, एन.पी. तडवी, पंडित पराडके, दिलवर पवार, राहुल शिंदे, पहाडसिंग पावरा, दुर्गादास पवार, झुंझार पावरा, रमेश पवार, नितीन ठाकरे, ओंकार भंडारी आदींनी हे निवेदन दिले.
प्रकाशा येथे आज बंद
अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करावी. तसेच घटनेच्या निषेधार्थ 22 जानेवारी रोजी सकाळी सात ते एक वाजेर्पयत प्रकाशा गावातील सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन याहामोगी ग्रुप, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, जातीअंतर्गत संघर्ष समिती, अल्पसंख्याक हक्क समितीने केले आहे. याबाबतचे निवेदन प्रकाशा दूरक्षेत्रात पोलिसांना देण्यात आले.
शहाद्यात उद्या आक्रोश मोर्चा
अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी आत्महत्येप्रकरणी शहादा तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना व पक्ष यांच्या वतीने 23 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता कृषी भवन येथून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. असल्याची माहिती दंगल सोनवणे, मोहन शेवाळे, अनिल कुवर, सुभाष नाईक, जयसिंग जाधव, गौतम खर्डे, रवींद्र ठाकरे यांनी दिली.
----------------------------
धार्मिक विस्तवावर ‘विवर’ने घातली फुंकर : जिभाऊ करंडक राज्य एकांकिका स्पर्धा
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हिंदू-मुस्लिमांमधील धार्मिक असंतोषासारख्या संवेदनशील विषयाला ‘विवर’ या नाटिकेव्दारे हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आह़े नाटिकेतील दोन्ही पात्रांनी दिग्दर्शकाच्या अपेक्षांची पूर्तता केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही़
इरफान मुजावरव्दारे लिखीत व प्रेरणा चंद्रात्रे दिग्दर्शीत ‘विवर’ या नाटिकेत आकांक्षा चंद्रात्रे व वृषाली रकिबे या दोन्ही कलाकारांनी अनुक्रमे विभा व हिनाची भुमिका पार पाडली आह़े कार्लमाक्सने सांगितल्यानुसार ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ या सूत्रावर आधारीत ही नाटीका रंगवण्यात आली आह़े मनुष्याच्या दैनंदिन जीवनावर तसेच त्यांच्या मनावर धर्माची किती पकड आहे, याचे उत्तम सादरीकरण या नाटिकेच्या माध्यमातून करण्यात आले आह़े हिंदू असलेली विभा ही एक प्रचंड धार्मिक वृत्तीची महिला परंतु जसा-जसा मुस्लिम असलेल्या हिनाशी तिचा संवाद वाढत जातो, तशी-तशी त्यांच्यातील ‘केमेस्टी’ अधिक घट्ट होत जाताना नाटकातून दिसून येत आह़े बाहेरील दंगेखोर वातावरणाला घाबरुन हिना ही विभाच्या घरी आश्रयाला येत़े सुरुवातीला हिनाच्या स्पर्शानेही स्वताला अस्पृश्य समजणारी विभा कालांतराने, वाढत्या संवादाने कशा प्रकारे हिनाला आपल्या जवळची समजू लागते याचा प्रवास यात सादर करण्यात आला आह़े परंतु एकीकडे धर्म तर दुसरीकडे मानुसकीच्या मध्यात अडकलेल्या विभाच्या मनाची घालमेल ही प्रेक्षकांना चांगलीच भावली आह़े नाटीकेच्या एका प्रसंगात दाखवल्या प्रमाणे, विभाच्या घरातील तेवत असलेला दिवा हा तिच्या मुलाच्या सुखरुपतेचे प्रतिक असतो़़ परंतु मासिक पाळीमुळे तो दिवा तेवत ठेवण्यात विभाला मोठी अडचण निर्माण होत असत़े शिवाय एका मुस्लिम धर्माच्या हिनाकडून दिव्यात तेल टाकणेही तिला मान्य नसत़े त्यामुळे दिव्यात तेल टाकण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या शोधात विभा घराबाहेर पडत़े परंतु तोवर दिव्याचे तेल संपत जाते हे पाहून कसलाही विचार न करता हिना त्या दिव्यात तेल टाकत़े तेल टाकण्यासाठी कुणीही न भेटल्याने हताश होऊन विभा घरी परतते परंतु तोवर संपूर्ण चित्र बदलले असत़े
देवघरासमोर नमाज अदा करीत असलेल्या हिनाकडे जिव्हाळ्याने विभाकडून पाहिले जात असताना या नाटिकेवर पडदा पडतो़ या नाटिकेच्या माध्यमातून धार्मिक हिंसाचार भडकवणा:या ‘काही’ लोकांना चपराक देण्याचा दिग्दर्शकाचा हेतू येथे सफल होताना दिसतो़