एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:36 AM2021-09-15T04:36:02+5:302021-09-15T04:36:02+5:30
दर महिन्याच्या ७ तारखेला होणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होण्यास विलंब ...
दर महिन्याच्या ७ तारखेला होणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होण्यास विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचाराचा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागतो. नंतर महामंडळाकडून त्याची नियमानुसार रक्कम दिली जाते. परंतु कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच निधी नसल्याने दीड ते दोन महिने पगार उशिरा होत आहेत. यात गेल्या एक वर्षापासून वैद्यकीय बिले मिळत नसल्याची स्थिती आहे. कर्मचाऱ्यांना डॉक्टरांच्या कागदपत्रांसह वैद्यकीय बिले कार्यालयास सादर करावी लागतात. त्याची पडताळणी केली जाते. बिल विभागीय पातळीवरील असेल त्याची मंजुरी विभागीय पातळीवरच मिळते. मात्र वैद्यकीय बिल मंजुरीसाठी होणारी फिरवाफिरव व आर्थिक पिळवणुकीमुळे अनेक कर्मचारी लाभ घेताना दिसून येत नाहीत. नंदुरबार जिल्ह्यात चार आगार असून सुमारे एक हजार ५०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
वैद्यकीय बिले वर्ष-वर्ष मिळेनात
कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. वैद्यकीय बिलांचा परतावा देण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. वैद्यकीय बिलाचा प्रस्ताव सादर करून देखील अनेक महिने उलटूनही कर्मचाऱ्यांना बिलाचा परतावा मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पगार दोन महिन्यांतून एकदा
कोरोना काळात गेल्या १७-१८ महिन्यांत वारंवार वेतन विलंबाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबर महिन्यात मिळाले. उशिरा होत असलेल्या वेतनामुळे अनेक कर्मचाऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकते तर, कोणाकडे किराणा दुकानदारांची थकबाकी वाढते. या सगळ्याला सामोरे जात एसटीचे कर्मचारी सेवा देत आहेत.
उपचारावर झालेला खर्च कोठून आणावा
इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत. आमचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. दोन महिन्यातून एकदा पगार घ्यावा लागतो, अशी स्थिती आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कोरोनाने ग्रासले होते. त्या काळात दवाखान्यांमध्ये मोठ मोठे बिले निघाली. अनेक कर्मचाऱ्यांनी कर्ज घेऊन बिले भरली आहेत. त्यात वैद्यकीय बिले हे लवकर काढले जात नाहीत. अनेकदा तर ही बिले मिळतही नाहीत.
-एक कर्मचारी
इतर सेवांच्या तुलनेत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अनेकवेळा धावपळीने ड्यूटी करावी लागते. मात्र, त्या तुलनेत मिळणारा पगार खूपच कमी आहे. त्यातच वेळेवर न होणारा पगार यामुळे अनेक कर्मचारी कर्जबाजारी होत आहेत. वैद्यकीय सेवेसाठी लागणारा खर्चदेखील त्यांना परवडणारा नाही. म्हणून वेळेवर पगार होऊन मेडिकल बिले मिळावीत.
-एक कर्मचारी
जिल्ह्यातील एकूण आगार चार
आगार / कर्मचारी
शहादा - ४२९
नवापूर - २७०
अक्कलकुवा - २४०
नंदुरबार - ५००