शहाद्यातील नवीन वसाहतींमध्ये साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:37+5:302021-09-11T04:30:37+5:30
यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान विजांचा ...
यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दीड-दोन तासांत पावसाने कहर करून टाकला. शहराच्या पूर्वेकडील १५ ते २० गावांतील नदी-नाल्यांचे पाणी शहादा शहरातील नवीन वसाहतींमध्ये शिरले. विजय नगर-१, विजय नगर-२, काशी माँ नगर, परिमल कॉलनी, संभाजी नगर, दीनदयाल नगर यासह अनेक वसाहतीत रस्त्यांवर गुडघाभर पाणी वाहू लागले होते. या वसाहतीतील लोकांना या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी वस्तू खराब झाल्या. शहादा पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील नवीन वसाहतीतील लोकांना पावसाच्या पाण्यापासून गेल्या अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. २००६, २०१९ व २०२१ मध्ये पावसाचे पाणी नवीन वसाहतीतील नागरिकांच्या घरात शिरल्याने नुकसान झाले. या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरणार नाही यासाठी संबंधित विभागाने आतापासून नियोजन करावे, अन्यथा नवीन वसाहतीतील नागरिक जनआंदोलन उभारतील, असा इशारा दिला आहे.