निधी वळवत घाटरस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:56 PM2020-01-29T12:56:54+5:302020-01-29T12:57:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा महिन्यांपूर्वी तुटलेल्या चांदसैली घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला नाही. परंतु दुर्गम भागातील ...

Started repair work by turning the funds | निधी वळवत घाटरस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात

निधी वळवत घाटरस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सहा महिन्यांपूर्वी तुटलेल्या चांदसैली घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला नाही. परंतु दुर्गम भागातील नागरिकांची समस्या लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अन्य कामाचा काही अंशी निधी वळवत कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम मार्चएण्ड पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.
जिल्ह्यात धडगाव ते तळोदा हा रस्ता चांदसैली घाटामुळे सर्वाधिक अवघड ठरतो. त्यामुळे या मार्गावरुन केवळ लहान वाहतुकच सुरू करण्यात आली होती. त्यातही मिनीबस सेवेला हा रस्ता काही अंशी अनुकुल ठरत असल्यामुळे नंदुरबार आगारामार्फत मिनी बस देखील सुरू करण्यात आली.
या बससेवेमुळे दुर्गम भागातील सर्व प्रवाशांना हा मार्ग सोयीचा ठरत होता. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी तेथील नागरिकांना हाच मार्ग परवडत असल्यामुळे प्रवाशांची संख्या देखील मोठी होती. तर या प्रवास सेवेतून नंदुरबार परिवहन आगाराला मोठे उत्पन्न देखील मिळत होते. परंतु जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदसैली या मार्गावर ठिकठिकाणी रस्ता तुटला शिवाय वाहूनही गेला. त्यामुळे या रस्त्यावरुन होणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे या मार्गावरुन होणारी वाहतुक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविगाभामार्फत नंदुरबार परिवहन आगाराला बससेवा बंद करण्याचे पत्र देण्यात आले होते, त्यानुसार सेवा बंद करण्यात आली.
हा रस्ता लवकरच दुरुस्त होऊन बससेवाही सुरू होईल अशी अपेक्षा दुर्गम भागातील प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती. परंतु सहा महिन्यांनंतरही रस्ता दुरुस्त झाला नसल्यामुळे बससेवा बंदच ठेवण्यात आली. या बंद सेवेचा सर्वाधिक फटका दुर्गम भागातील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्याशिवाय नंदुरबार आगाराच्या चारही बसरफेऱ्यांमुळे या नियमित ये-जा करणाºया कर्मचाºयांना सोयीच्या ठरत होत्या. परंतु त्यांनाही खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रवाशांची ही समस्या लक्षात घेत सार्वजनिक बांधकामच्या तळोदा उपविभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात आली आहे. चांदसैली मंदिराजवळ तुटलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी निधी मंजूर झाला नाही. परंतु बांधकाम विभागाने अन्य कामाचा काही अंशी निधी वळवत कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
हे काम येत्या मार्चअखरपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे तळोदा उपविभागाचे शाखा अभियंता पी. जे. वळवी यांनी सांगितले. त्यामुळे बंद मिनीबस सेवा एप्रिलमध्येच सुरुहोण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपासून बस सेवेच्या प्रतिक्षेतील दुर्गम भागातील प्रवाशांना पुन्हा दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.


तळोदा ते धडगाव या मार्गावर सार्वजनिक बांधकामच्या तळोदा उपविभागाची हद्द चांदसैली येथील मंदिरापर्यंतच आहे. या हद्दीच्या अगदी टोकावरच दोन ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी निधी द्यावा म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आला परंतु मंजूर झाला नसल्याने तळोदा बांधकाम उपविभागासमोर अडचणी निर्माण झाल्या. परंतु त्यातही या विभागाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
तळोदा उपविभाग हद्दीत तुटलेल्या रस्त्यावर ४० व ३० मिटर असे एकुण ७० मिटरची सरक्षक भिंत बांधण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी अंदाजे ३० ते ३७ लाखाच्या निधीची आवश्यकता भासत असून हा निधी अन्य कामातून वळविण्यात येत आहे.
धडगाव बांधकाम उपविभागात उखळीआंबा येथे दोन तर गौऱ्या येथील नदीवरील पुलाच्या ठिकाणी असे तीन ठिकाणी रस्ता तुटला आहे. तळोदा हद्दीतील रस्ता दुरुतीसह धडगाव हद्दीतील कामासाठीही प्रस्ताव सादर करण्यात आले. परंतु दोन्ही प्रस्तावांना मंजूर मिळाली नसल्याने सहा महिन्यांपासून या मार्गावर बससेवा बंद आहे.गरज ओलखून तळोदा उपविभागाने मार्ग काढला. तसा मार्ग धडगाव विभागामार्फतही सुरू आहे.

Web Title: Started repair work by turning the funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.