बर्डीपाडा येथे 13 वर्षानंतर शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:30 PM2019-07-10T12:30:53+5:302019-07-10T12:31:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहादा तालुक्यातील शेल्टीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहादा तालुक्यातील शेल्टीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर 2006 मध्ये आलेल्या महापुराने पुनर्वसन झालेल्या बर्डीपाडा वसाहतीत 13 वर्षानंतर नवीन शाळा सुरू करून शिक्षणाचा मुहूर्त करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात शिरूडचे केंद्रप्रमुख एस.एन. चौधरी हे शेल्टी शाळेला भेट देऊन वर्ढेटेंभे येथे जात असताना त्यांना डोंगराच्या पायथ्याशी वस्ती दिसली. तेथे जाऊन त्यांनी चौकशी केली असता बरीच मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यानंतर त्यांनी विस्तार अधिकारी उषा पेंढारकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. चौधरी व पेंढारकर यांनी बर्डीपाडा येथे जाऊन गावातील मुलांचा सव्रे केला. तेव्हा येथे 40 मुले आढळून आली. त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत या सर्व मुलांना दीड किलोमीटर अंतरावरील ससदे टेकडी येथील शाळेत दाखल केले. मात्र लहान मुलांना डोंगर ओलांडून शाळेत जाणे कसरतीचे ठरत होते. त्यामुळे उषा पेंढारकर व चौधरी यांनी गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील यांच्याशी बर्डीपाडा येथेच शाळा सुरू करण्याबाबत चर्चा केली. पाटील यांनी शाळा सुरू करण्याबाबत परवानगी दिल्याने त्यांच्याच हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी उषा पेंढारकर, केंद्रप्रमुख एस.एन. चौधरी, सुनील ठाकरे, माजी सरपंच दाज्यू मोरे, ग्रामस्थ व शिरूड, शेल्टी, वर्ढेटेंभे, ससदे टेकडी, पळसवाडा येथील शाळांचे शिक्षक उपस्थित होते. या नवीन शाळेवर शेल्टी येथील शिक्षक सुनील गवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी गटशिक्षणाधिकारी पाटील व पेंढारकर यांनी पालकांना मुलांना नियमित शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन मोहन शिंपी यांनी केले.