नंदुरबारात राज्यस्तरीय वारकरी संमेलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:12 AM2018-12-22T11:12:00+5:302018-12-22T11:12:05+5:30
उद्घाटन : भक्तीतच शक्ती सामावलेली-खासदार हीना गावीत
नंदुरबार : नंदुरबार- भजन कीर्तनातून संस्कार घडत असतात. भक्तीतच सर्वात मोठी शक्ती सामावलेली असून, वारकरी संप्रदायातून समानता व समाज एकात्मतेचे दर्शन घडत असते असे प्रतिपादन खा.डॉ. हिना गावित यांनी केले. राज्यस्तरीय वारकरी संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली.
शुक्रवार, 21 डिसेंबर पासून नंदुरबारात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा कमिटीच्या वतीने माळीवाडा परिसरात राज्यस्तरीय वारकरी संमेलन तथा भव्य कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन खासदार गावीत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रास्ताविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, भाजप ओबीसी मोचार्चे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती मनोज रघुवंशी, यशोदाबाई जायखेडकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक आनंदा माळी, भिला खोरी महाराज, अनिल महाराज वाळवे, किशोर महाराज प्रकाशेकर, विजय महाराज जाधव, छोटू महाराज, डॉ.तुषार सनसे, कृषिभूषण पाटीलभाऊ माळी, चारुदत्त कळवणकर, गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव, विजय माळी आदी उपस्थित होते
खासदार डॉ. गावित म्हणाल्या, चांगले जीवन जगण्याची दिशा संतांच्या विचारांतून होत असते. समाजात आज ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या संतांच्या विचार प्रेरणेमुळेच घडत आहेत. वारकरी संमेलन जिल्ह्यासाठी पर्वणी ठरणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले, संमेलनातून राष्ट्र घडत असते. या संमेलनात व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी संयोजकांना केले.
वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले म्हणाले, अधिकारी, वारकरी व पुढारी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळी राष्ट्राचा ख:या अर्थाने विकास व्हायला वेळ लागणार नाही. वारकरी आता भावनाहीन राहिलेला नसून तो सर्वत्र सामावलेला असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनात मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.