चोरी झालेली दुचाकीचा सोशल मिडियातून शोधली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:50 PM2019-12-06T12:50:38+5:302019-12-06T12:50:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शेल्टी ता़ शहादा येथून चोरीला गेलेली मोटरसायकल सोशल मिडियाच्या माध्यमातून युवकांनी २४ तासाच्या आत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शेल्टी ता़ शहादा येथून चोरीला गेलेली मोटरसायकल सोशल मिडियाच्या माध्यमातून युवकांनी २४ तासाच्या आत शोधून ती परत मिळवल्याची सुखद घटना घडली आहे़ जागृत नागरिकांची भूमिका पार पाडत युवकांनी केलेल्या या कार्याचे शेल्टीसह पंचक्रोशीतून कौतूक होत आहे़
शेल्टी येथील अश्विन रमेश पाटील यांची एमएच ३९ एम ५८९७ ही मोटारसायकल मंगळवारी मध्यरात्री घरासमोरुन चोरीस गेली होती़ पहाटे अडीच वाजता गव्हाला पाणी देण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर अश्विन पाटील यांना दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले होते़ त्यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने दुचाकीची शोधाशोध केली असता, अश्विन पाटील यांच्या दुचाकीऐवजी विनाक्रमांक असलेली नवी मोटारसायकल गावात आढळून आली़ चोरट्यांनी पेट्रोल संपल्याने ती दुचाकी गावात ठेवून अश्विन पाटील यांची दुचाकी चोरुन नेली असावी असा अंदाज व्यक्त करत ग्रामस्थांनी शेल्टी विकास मंच या सोशल मिडिया ग्रुपद्वारे चोरीला गेलेल्या मोटारसायकलचे फोटो व्हायरल करुन मदत मागितली होती़ दरम्यान बुधवारी दुपारी अक्कलकुवा येथून घरी परतणारे नांदरखेडा ता़ शहादा येथील तुषार गिरासे व शेल्टी येथील सागर धनराज पाटील या दोघा युवकांना ही दुचाकी बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोदलपाडा गावाजवळ रस्त्याच्या कडेला लावल्याचे दिसून आले़ त्यांनी तातडीने शेल्टी गावच्या ग्रुपवर मेसेज टाकत माहिती दिली़ अश्विन पाटील यांनाही खात्री पटल्यावर दोघा विद्यार्थ्यांनी पेट्रोल टाकून दुचाकी परत शेल्टी येथे आणली़ दोघांचे ग्रामस्थांच्यावतीने कौतूक करण्यात येत आहे़
अश्विन पाटील यांच्या दुचाकीचा शोध लागला असला तरी गावात मिळून आलेली विनाक्रमांकाची दुसरी दुचाकी नेमकी कोणाची याची माहिती मिळालेली नाही़ ग्रामीण भागात येऊन चोरी करणाऱ्यांकडून चोरीच्या मालाची अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याचा हा प्रकार निव्वळ शौक म्हणून करण्यात आला असावा असाही अंदाज आहे़ याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे़