जंगलातून मोळी नेताना रोखले; वनरक्षकाच्या हाताला चावले, नंदुरबारमधील घटना
By भूषण.विजय.रामराजे | Published: December 26, 2023 05:04 PM2023-12-26T17:04:35+5:302023-12-26T17:05:10+5:30
नंदुरबार तालुक्यातील आष्टे वनक्षेत्रात पेट्रोलिंग करणाऱ्या वनरक्षकाला दोघे जण लाकडाची मोळी घेऊन जात असल्याचे दिसून आले होते.
भूषण रामराजे,नंदुरबार : तालुक्यातील आष्टे वनक्षेत्रात पेट्रोलिंग करणाऱ्या वनरक्षकाला दोघे जण लाकडाची मोळी घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. दोघांना वनरक्षकाने लाकूड तोडीस मनाई केल्यानंतर एकाने थेट वनरक्षकावर हल्ला चढवत हाताच्या बोटाचा चावा घेतला. २२ डिसेंबर रोजी घडलेल्या या प्रकारानंतर वनविभागाने दोघांचा शोध घेत सोमवारी उशिरा पोलिसांत फिर्याद दिली.संजय वसंत देशमुख असे हल्ला झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे.
वनरक्षक देशमुख हे २२ डिसेंबर रोजी सकाळी पथकासह आष्टे वनक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना दोन जण जंगलात लाकूड तोड करून मोळी घेऊन जात असल्याचे दिसून आले. यामुळे संजय देशमुख यांनी दोघांना मनाई करत लाकूड खाली ठेवण्यास सांगितले. याचा राग येऊन दोघांनी देशमुख यांच्यावर हल्ला चढवला होता. यात एकाने वनरक्षक देशमुख यांचे हात पकडले तर दुसऱ्याने त्यांच्या बोटांना चावा घेत दुखापत केली. घटनेनंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते.
दरम्यान, त्यांनी ही बाब वरिष्ठांना कळवल्यानंतर वनपथकाने दोघांचा शोध घेतला असता, दोघेही पिता-पुत्र असल्याची माहिती समोर आली. दोघेही अजेपूर (ता. नंदुरबार) येथील रहिवासी आहेत. दीपक मांगीलाल भोये (५५) व प्रफुल्ल दीपक भोये (२२) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वनरक्षक संजय देशमुख यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दीपक भोये (५५) आणि प्रफुल्ल भोये (२२) या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.