वादळ टळले, पाऊस कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:26 PM2020-06-05T12:26:23+5:302020-06-05T12:26:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह ...

The storm subsided, the rain fell | वादळ टळले, पाऊस कोसळला

वादळ टळले, पाऊस कोसळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी रस्ते पाण्यात गेले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही जीवीत हाणी झाली नाही. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
जिल्हा प्रशासनाने चक्री वादळाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र दक्षता घेतली होती. हवामान विभागाने नंदुरबारला रेड अलर्ट देखील दिला होता. त्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षीत स्थळी देखील हलविण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत प्रशासन दक्ष होते. परंतु वादळाने दिशा बदलल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु अती पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी मात्र दक्षता घेण्यात आली. तरीही शेती पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. रस्तेही पाण्यात गेले. वीज पुरवठा अनेक भागात १० ते १२ तास खंडित होता.
वादळ नाही, पण पाऊस बरसला
वादळ आले नाही , परंतु पाऊस बºयापैकी बरसला. रात्री ९ वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्री ११ वाजता हवेचा वेग वाढून पावसाचाही वेग वाढला होता. हवेच्या वेगामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. मोठी वित्त हाणी मात्र कुठेही झाली नाही. पावसाची रिपरिप पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत सुरूच होती. नंतर मात्र पावसाचा वेग मंदावला. सकाळी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर मात्र ढगाळ वातावरण कायम होते.
नवापूर, नंदुरबारात पाऊस
गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास नवापूर व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. नंदुरबारात सायंकाळपर्यंत रिपरिप सुरू होती. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. तालुक्याच्या पश्चिम पट्टयात पावसाचा जोर बºयापैकी होता.
१२ तास वीज खंडित
नंदुरबार तालुक्यासह अनेक भागात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत तब्बल १० ते १२ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे आणि वादळामुळे काही मुख्य वीज वाहिनीचे नुकसान झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. सकाळी दुरूस्ती करून ८ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले. त्यामुळे ग्रामिण भागात संपुर्ण रात्र वीज पुरवठा खंडित राहिला. वीज कंपनीने मान्सूनपूर्व दुरूस्ती करून उपाययोजना देखील केलेल्या असतांनाही वाळवाच्या पावसातच वीज कंपनीच्या तयारीचे आणि नियोजनाचे वाभाडे निघाल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.
पंचनामे करण्याच्या सुचना
वादळ आणि पावसामुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले असल्यास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतात सध्या फळ पिकांमध्ये केळी, पपई आहे.त्यांचे नुकसान झाले. याशिवाय सातपुड्यात आंब्याचेंही मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यात वादळामुळे काही घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पंचनामे पुर्ण झाल्यावर नुकसानीचा एकुण अंदाज कळणार आहे.
निर्माणाधिन रस्त्यांची दुरावस्था
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. निर्माणाधिन असलेल्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने गाळ व चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे रहदारीवर परिणाम झाला होता. चिखलातून वाहनचालकांना वाट काढावी लागत होती. कोळदा-खेतिया रस्ता, समशेरपूर-करणखेडा, असलोद-वैजाली रस्ता यासह इतर रस्त्यांची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्या कामांवर परिणाम झाला आहे.


बुधवारी दिवसभर व पहाटेपर्यंत झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हा जलमय झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात ५९ मि.मी.इतकी झाली. त्या खालोखाल शहादा तालुक्यात ४८, नवापूर तालुक्यात ४०, तळोदा तालुक्यात ३५, अक्कलकुवा तालुक्यात २८ तर धडगाव तालुक्यात सर्वात कमी १३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने जिल्ह्यातील काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Web Title: The storm subsided, the rain fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.