मंदाणे येथे रूग्ण संख्येत वाढ झाल्याने कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:32 PM2020-07-22T12:32:45+5:302020-07-22T12:32:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे गावात पुन्हा कोरोना रूग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे गावात पुन्हा कोरोना रूग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या रूग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यापैकी एक महिला रूग्ण बरी होवून घरी परतली आहे.
दरम्यान, संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, गुरूवारपर्यंत कडक लॉकडाऊन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याबाबत असे की, तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यप्रदेश सीमेलगत प्रमुख बाजार पेठेचे मध्यवर्ती केंद्र समजल्या जाणाऱ्या मंदाणे गावात नेहमी वर्दळ असते. देशभरात उद्भवलेल्या कोरोना महामारीची लागण गावात होवू नये म्हणून ग्रामपंचायत, आरोग्य व पोलीस प्रशासनातर्फे पुरेपूर काळजी घेण्यात आली, असे असतानाही अहमदाबादहून आलेली महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.
या वेळी बाधितांच्या संपर्कातील ३२ जणांना क्वॉरंटाईन सेंटरला पाठविण्यात आले होते. मात्र सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले व बाधित महिला बरी झाली. यानंतर गावातील व्यवहार सुरळीत झाले असताना पुन्हा गेल्या आठवड्यात एका शेतकºयाला कोरोनाची बाधा झाली असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सतर्कता ठेवून संपूर्ण गल्लीला बॅरिकेटींग केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.
गावातील काही गल्ल्या बंद करण्यात आल्या. पुन्हा १८ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार पुन्हा ३० वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून, संपूर्ण गल्लीत फवारणी करण्यात आली. बाधीत तरूणाच्या आई-वडीलांना मोहिदा येथील क्वॉरंटाईन सेंटरला दाखल करण्यात आले आहे.
गावात आतापर्यंत तीन रूग्ण आढळून आल्याने गावात व परिसरात कोरोनाचे संक्रमण होवू नये म्हणून संपूर्ण गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनानेही गुरूवारपर्यंत कडक लॉकडाऊन केले असून, अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या व बाहेर जाणाºया सर्वच वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे टाळावे व काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच विजय सनेर, उपसरपंच अनिल भामरे, पोलीस पाटील, सुभाष भिल, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर यांनी केले आहे.