चरणमाळ घाटात कर्मचाऱ्यांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:17 AM2019-03-14T11:17:57+5:302019-03-14T11:18:05+5:30

तिघे संशयीत : सव्वा दोन लाख घेवून पसार

Strike employees in Charak Ghat | चरणमाळ घाटात कर्मचाऱ्यांना लुटले

चरणमाळ घाटात कर्मचाऱ्यांना लुटले

googlenewsNext

नंदुरबार : नवापूर येथून चरणमाळ ता़ साक्री येथे दूध उत्पादक संघाचे पैसे घेऊन जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांना लुटल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ दुचाकीने आलेल्या लुटारुंनी सव्वादोन लाख रुपये लुटून नेले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
चरणमाळ ता़ साक्री येथील गुलाब छगन मावची व रेशमा जान्या मावची हे चरणमाळ दूध संघाची वसुली करुन एमएच १८ एएल ६५२४ या दुचाकीने मंगळवारी दुपारी रायंगणपाडा ता़ नवापूर येथून चरणमाळकडे जाण्यासाठी निघाले होते़ दरम्यान चरणमाळ घाटातून जात असताना अचानक मागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला़
गुलाब मावची यांना शंका आल्याने त्यांनी दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला परंतू तिघांनी दुचाकी थांबवत मावची यांच्याकडील २ लाख २७ हजार ५०० रुपये असलेली पैशांची बॅग हिसकावून घेतली़ यादरम्यान झालेल्या झटापटीत गुलाब मावची व रेशमा मावची या दोघांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली़ तिघेही नवापूूरकडे निघून गेल्याची माहिती आहे़ दोघांना जखमी अवस्थेत नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर गुलाब मावची यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील करत आहेत़
दोघा जखमींची उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी भेट घेत माहिती जाणून घेतली़ दरम्यान, याच घाटात आठ महिन्यांपूर्वी हवाला मार्गाची मोठी रक्कम लुटण्यात आली होती. त्यामुळे या घाटात पोलीस चौकी तयार करावी व पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Strike employees in Charak Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.