कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:32 PM2020-04-22T12:32:50+5:302020-04-22T12:33:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर हा भाग प्रशासनाने सील केला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर हा भाग प्रशासनाने सील केला आहे़ यानंतर तीन दिवस लॉकडाऊनचे कठोरपणे पालन केले गेले़ मंगळवारी तीन दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची एकच धडपड सुरु असल्याचे दिसून आले़
मंगळवारी सकाळी शहरातील विविध भागात सकाळी आठ ते दुपारी १२ या दरम्यान भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु करण्यात आली होती़ यातून सील करण्यात आलेला प्रभाग १० वगळण्यात आला होता़ मंगळबाजार, सुभाष चौक, नेहरु चौक, पाट बाजार या सह विविध भागात भाजीपाला विक्रेते आणि किराणा दुकानादार दाखल झाले होते़ यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे टाळले जात असल्याने पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांच्या पथकाने भेटी नागरिकांना समज देऊनही गर्दी कमी होत नसल्याचे चित्र होते़ गर्दी कमी करण्यासाठी सकाळी शहराचे दोन भाग करण्यात आले होते़ उड्डाणपुलामुळे दोन्ही भागांचे विभाजन करुन कामकाज सुरु होते़ उड्डाणपुल ओलांडून कोरीट रोड व परिसरातील कोणासह गांधीपुतळ्याकडे प्रवेश देण्यात येत नव्हता़ तर गांधी पुतळा मार्गाने उड्डाणपुलावरुन येणाऱ्यांना अटकाव करण्यात आला़ दक्षता म्हणून पोलीसांनी नळवे रोडावरील बोगदाही सील केला असल्याने या वाहतूकीवर मर्यादा आली होती़
तहसीलदारांच्या हाती दंडूका़़़
सकाळी मंगळबाजार आणि परिसर सील असतानाही अनेक जण येथे गर्दी करत होते़ यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे पथकासह याठिकाणी पोहोचले होते़ यावेळी त्यांनी भाजीविक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना केल्या़ परंतू विक्रेते आणि ग्राहक हे दोन्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तहसीलदार थोरात यांनी थेट पोलीसाची काठी हाती घेत विक्रेत्यांवर उगारली होती़ यानंतरही बऱ्याच जणांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सुरुवात केली़ प्रथमच तहसीलदाराने दंडुका हाती घेतल्याचा हा प्रकार झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ शहरात सील करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १० मधून सकाळी बाहेर पडण्यासाठी अनेकांनी बॅरीकेटींग ओलांडले होते़ फडके चौकातील बॅरीकेटींग तसेच इलाही चौकाकडून सोनार खुंटाकडे येणारे बॅरीकेटींग ओलांडून महिला आणि पुरुष बाजार आल्याचे दिसून आले होते़
हुज्जत घालणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा
४पोलीसांकडून सकाळी जागोजागी बॅरीकेटींग करुन नागरिकांनी वाहने आणू नये असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते़ परंतू नियम डावलून अनेक जण दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन बाजारात येत होते़ यावेळी गांधी पुतळा परिसरात एकाला पोलीसांनी हटकल्यानंतर त्याने पोलीसांसोबत हुज्जत घातली़ यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी हे घटनास्थळी हजर झाले होते़ त्यानी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ यानुसार भरत भिमसिंग वसावे रा़ गुरुकुल नगर २ होळ तर्फे हवेली शिवार याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
४दरम्यान मंगळबाजारात पेट्रोल भरताना राजकुमार प्रतापसिंग राजपूत हा आढळून आला होता़ त्याच्यावरही पोलीसांनी कारवाई करुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़