मुले पकडणा:यांच्या संशयावरून नंदुरबारातील शिक्षिकेलाही झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:02 PM2018-06-28T13:02:09+5:302018-06-28T13:02:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुले पकडणा:याच्या संशयावरून महिलांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ शहरातील एका नामांकीत शाळेतील शिक्षिकेलाही आली. अखेर पोलिसांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी सर्व बाब स्पष्ट केल्यानंतर महिलेची चौकशी करून घरी जावू देण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.
शहरासह जिल्ह्यात लहान मुले पकडणारे फिरत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अनेकांना यामुळे संशयावरून विनाकारण मारही खावा लागला आहे. पोलिसांनी याबाबत वेळोवेळी आवाहन करून चुकीचे मेसेज फैलावणा:यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. या अफवेचा सामना नंदुरबारातील एका शाळेतील शिक्षिकेलाही करावा लागला. मंगळवारी सायंकाळी संबधीत शिक्षिका साक्री नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय चौफुली रस्त्याने जात असतांना तेथील एका वस्तीजवळ शिक्षिकेच्या दुचाकीतील पेट्रोल संपले.
संबधीत शिक्षिकेने एका चालकाकडून लिफ्ट मागून पेट्रोल आणले. नंतर दुचाकीमध्ये टाकत असतांना तेथील काही महिलांना संशय आला. शिक्षिका घाबरून पळू लागली असता संशय अधीकच वाढला. पोलिसांना कळवून शिक्षिकेला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिक्षिकेने पती, शाळेचा स्टाफ यांना दूरध्वनीद्वारे पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
दरम्यान, या घटनेची शहरात एकच चर्चा सुरू आहे. नागरिकांनी कुठलीही शहनिशा न करता कुणावरही संशय व्यक्त करू नये. यामुळे एखाद्याचे वैयक्तिक आणि भविष्यातील नुकसानही होऊ शकते. पोलिसांना लागलीच कळवावे असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.