वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अधांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:34 PM2020-12-22T12:34:24+5:302020-12-22T12:34:32+5:30

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  काही ठराविक जिल्ह्ये वगळता राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी समाज ...

Students' education is disrupted due to hostel closure | वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अधांतरीत

वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अधांतरीत

googlenewsNext

रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  काही ठराविक जिल्ह्ये वगळता राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी समाज कल्याण विभाग व आदिवासी विकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वस्तीगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलीच असल्याने जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांचा यंदाचा शैक्षणिक भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णता विस्कळीत झाले आहे. शिक्षण विभागाने सुरूवातीला ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग काढला. त्यानंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २३ नाेव्हेंबरपासून तर काही जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सुरु झाल्या आहेत. मात्र शाळा सुरू करताना नियोजनाचा अभाव असल्याने त्याचे अनेक परिणाम प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर दिसू लागले आहे. सुरूवातीला शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र स्वॅब घेतल्यानंतर अनेक शिक्षकांचे अहवाल तब्बल १२ ते १५ दिवसांनी आले. जे शिक्षक शाळेत जात होते पण त्यांचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्याने शाळांची पंचायत झाली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात अनेक शाळा सुरू करून आठ दिवसानंतर पुन्हा बंद कराव्या लागल्या. शाळा सुरू झाल्यानंतरही एस.टी. पासेस संदर्भात निर्णय नव्हता. म्हणून बाहेर गावाहून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. आता वस्तीगृहाबाबतचा प्रश्न मात्र अद्यापही ऐरणीवर आहे. नववी ते १२ वी पर्यंतचे जवळपास दीड लाख विद्यार्थी समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाच्या वस्तीगृहात राहून शिक्षण घेतात. हे विद्यार्थी दुर्गम अतिदुर्गम भागात राहात असल्याने या विद्यार्थ्यांना रोज शाळेत येण्यासाठी अनेक अडचणी आहेत.     वस्तीगृहातील प्रवेश नक्की होणार की, नाही याबाबत त्यांना व पालकांना प्रश्न पडला आहे. 
वस्तीगृहातील जुन्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रियादेखील राबविण्यात आलेली नाही. दुसरीकडे शाळा सुरू झाल्यामुळे ऑनलाईन वर्ग बंद झाले. म्हणून हे विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण मुकले आहेत. जवळपास निम्म्या जिल्ह्यात शाळा सुरू होवून महिना झाला. मात्र वस्तीगृहातील विद्यार्थी अद्याप शाळेपासून लांब आहेत. त्यातच १२ वीचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर १० वीची प्रक्रिया येत्या ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण करतील असा प्रश्न पालकांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अनिश्चितता  वस्तीगृहातील प्रवेश निश्चित झाल्याशिवाय विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेश निश्चित होत नाही. त्यामुळे अद्यापही वस्तीगृहातील विद्यार्थी शाळेपासून लांब आहेत. जोपर्यंत वस्तीगृहातील यादी जाहीर होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला कुठलाही शालेय योजनेचा लाभही मिळणार नाही. सद्या स्कॉलरशिपचे अर्ज भरणे सुरू आहे. पण त्यासाठी रेक्टरचे पत्र आवश्यक असल्याने या विद्यार्थ्यांना ते फॉर्मही भरता येत    नाही.

‘‘वस्तीगृहातील प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी यासंदर्भात आपण विरोधी पक्ष नेत्यांना प्रत्यक्ष भेटून व मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यासंदर्भात ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली पण तांत्रिक अडचणींमुळे तेही ठप्प आहेत. अशीच गती राहिली तर पुढील तीन महिनेही प्रवेश प्रक्रिया होऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षाला मुकावे लागेल. 
                     -राजेंद्रकुमार गावीत, संस्थाचालक, नंदुरबार.

Web Title: Students' education is disrupted due to hostel closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.