धडगाव तालुक्यात इंंटरनेटच्या समस्येने विद्यार्थी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:40+5:302021-01-15T04:26:40+5:30
धडगाव तालुकातील अतिदुर्गम भाग दूरसंचार नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्येने ग्रासला आहे. शासकीय तसेच बँक कार्यालयात दैनंदिन वापरासाठी ऑनलाइन नेटवर्कची सुविधा ...
धडगाव तालुकातील अतिदुर्गम भाग दूरसंचार नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्येने ग्रासला आहे. शासकीय तसेच बँक कार्यालयात दैनंदिन वापरासाठी ऑनलाइन नेटवर्कची सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र या भागात नेटवर्क रेंज मिळणे मुश्कील होत असल्याने नागरिकांना ऑनलाइन व्यवहारांसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार नेटवर्कच्या समस्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांसमोर निर्माण होत आहेत. दूरसंचार विभागाने तत्काळ या समस्येची दखल घेऊन उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून वारवांर होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिक खेड्यापाड्यातून २५ ते ३० कि.मी आपली प्रशासकीय कामे व बँकेची कामे करण्यासाठी धडगाव शहरात येतात. परंतु तालुक्यातील बहुतांशी प्रशासकीय ऑनलाइन सुविधा व बँकिंगची कामे दूरसंचार नेटवर्कवर अवलंबून असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. या नेटवर्कच्या असुविधेबाबतीत तालुक्यातील सामाजिक संघटनांनी अनेकदा निवेदनाद्वारे तक्रारी केल्या. सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार उपोषण केले, परंतु तक्रारीची दूरसंचार विभागाने दखल न घेता विचारलेल्या जबाबाची खोटी आश्वासने दिली जात आहेत, अशी भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
धडगाव तालुक्यातील दूरसंचार सुविधा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे. उपोषण करून व निवेदन देऊनही धडगाव तालुक्यातील दूरसंचार सुविधा सुरळीत होताना दिसत नसून लवकरच ही सुविधा सुरळीत केली नाही तर तालुक्यातील दूरसंचार कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप लावून दूरसंचारचे सिमकार्ड विक्री बंद करू व सिमकार्ड परत करण्यास अभियान राबवू.
- जितेंद्र दिलीप ढोले, तालुका समन्वयक, महाराष्ट्र राज्य युवा परिषद