जिल्ह्याच्या राजकारणात अचानक व्टिस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:42 AM2020-01-28T11:42:23+5:302020-01-28T11:42:54+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कालपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात एकमुखी सत्ता गाजविणारे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक व ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कालपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात एकमुखी सत्ता गाजविणारे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक व चंद्रकांत रघुवंशी यांना मात्र जिल्हा परिषद सभापती निवडीत अपयशाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे काँग्रेस आणि भाजपत रात्रीतून अनोखा समझोता झाल्याने जिल्ह्यातील राजकारणातच अचानक टिष्ट्वस्ट आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्याचे राजकारण आगामी काळात वेगळ्या दिशेने वळण घेणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी केलेले पक्षांतर त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीचा महाआघाडीने केलेले सत्तांतर यामुळे जिल्ह्यातील राजकारणाची अक्षरश: खिचडी झाली आहे. स्थानिक पातळीवरील संबध, पक्षाशी केलेली तडजोड आणि त्यातच राज्यातील सत्तेची वेगळी महाआघाडी यामुळे बहुतांश नेत्यांची गोची झाली आहे. त्यामुळे नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी व आपसातील संबध आता हळूहळू उघड होऊ लागले असून राजकारणाची दिशाही स्पष्ट होऊ लागली आहे.
विधानसभा निवडणूक काळात काँग्रेसचे तत्काली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदारकीचा राजीनामा देवून शिवसेनेत प्रवेश केल्याने तेथेच राजकारणाला एक वेगळा मोड आला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही नवापूर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या गुरु-शिष्याच्या राजकीय भुमिकेची खूप चर्चा झाली. दुसरीकडे शिवसेनेला अक्कलकुवा ही एकच जागा मिळाल्याने ती जिंकण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यातून सहाजिकच विद्यमान पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्याशी दुरावा आला. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. सहाजिकच या दोघांमधील कटूता पुन्हा वाढली. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला बहुमत न मिळाल्याने केवळ सात सदस्य जिंकणाऱ्या शिवसेनेलाच सत्ता स्थापन करण्यासाठी महत्व आले होते. त्यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेस हे दोघे पर्याय खुले ठेवले होते. अखेरच्या दिवशी पक्षाच्या आदेशानुसार काँग्रेस-शिवसेनेची युती झाली. पण अध्यक्ष निवडीतही भाजपने काँग्रेसला पाठींबा देत अध्यक्षपद काँग्रेसला बिनविरोध दिले. उपाध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक लावली. तेथेच खूप काही राजकारण शिजले. पण उपाध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसचे सदस्य फुटले नाहीत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राम रघुवंशी यांना पाठींबा देत २६ विरुद्ध ३० मतांनी विजयी केले. अर्थात उपाध्यक्ष निवडीत जे झाले नाही ते सभापती निवडीत मात्र झाल्याने राजकारणाची दिशाच बदलली आहे.
जि.प.सभापती निवड करतांना निवडीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि शिवसेनेत समझोता झाला होता. मंत्री के.सी.पाडवी, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, चंद्रकांत रघुवंशी व काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सभापती निवडीचा फार्म्यूला ठरला. पण प्रत्यक्ष निवडीच्या वेळी मात्र काँग्रेसच्या सदस्यांनी धोका दिल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणूक ते जिल्हा परिषद निवडणूक पर्यंत रघुवंशी आणि मंत्री पाडवी यांच्यात आलेली कटूता सभापतीच्या निवडीच्या वेळी अधीक वाढली. शिवसेनेने सभापतीपदासाठी के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभूत करणाºया उमेदवारालाच पुढे केल्याने काँग्रेसचे काही सदस्य नाराज झाल्याचे बोलले जात आहे. अर्थात अंतर्गत घडामोडी व नाराजीचे कारणे काहीही असली तरी जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या दिशेने वळण घेत असल्याचे स्पष्ट आहे. आगामी काळात राज्यात शिवसेना-काँग्रेस महाआघाडी असली तरी स्थानिक पातळीवर मात्र या आघाडीत नेहमीच खटके उडणार हे स्पष्ट आहे.