साखर उत्पादनात महाराष्ट्राची विक्रमाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:16 PM2018-03-15T12:16:58+5:302018-03-15T12:16:58+5:30
रिटर्न मान्सूनचा फायदा : आतार्पयत 92 लाख टनहून अधिक साखरेचे उत्पादन
रमाकांत पाटील।
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : साखर तज्ज्ञांचा अंदाज चुकवीत यंदा महाराष्ट्राने साखर उत्पादनात प्रचंड आगेकूच केली आहे. आतार्पयत 92 लाख 59 हजार टन साखरेचे उत्पादन झाले असून, अजून महिनाभर कारखाने चालण्याचा अंदाज असल्याने यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्र आजवरचा उच्चांक गाठेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
राज्यात उसाचे क्षेत्र आता पूर्वी प्रमाणेच वाढल्याने बंद असलेले साखर कारखान्यांनीही यंदा मरगळ झटकून गाळपाला सुरूवात केली होती. त्यामुळे यावर्षी राज्यातील 100 सहकारी तथा 86 खाजगी असे एकूण 186 कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरूवात केली आहे. यातील बहुतांश कारखाने जवळपास पूर्ण क्षेमतेने गाळप करीत आहेत. त्यामुळे आतार्पयत या कारखान्यांनी 825 लाख टन उसाचे गाळप केले असून, 11.06 चा सरासरी उता:याने 92 लाख टन पेक्षा अधिक साखरेचे उत्पादन केले आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षाचे चित्र पाहिल्यास एकूण 88 सहकारी व 62 खाजगी असे 150 साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केली होती. तथापि उसाअभावी कारखाने लवकर बंद झाले. एकूण 370 लाख 50 हजार टन उसाचे गाळप गेल्या वर्षी झाले होते. त्यापासून 41 लाख 57 हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते.
यावर्षी मात्र उसाची लागवड ही अधिक झाल्याने शिवाय गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये जो रिटर्न मान्सून झाला होता त्याचा उसाच्या वाढीला व उत्पादनाला प्रचंड फायदा झाल्याचे उस तज्ज्ञांचे मत आहे. विशेषत: ऑक्टोबर महिन्यात उसाला पाण्याचा ताण पडल्यास तो पुढे रिकव्हर करण्यासाठी किमान चार महिन्याचा काळ जातो. त्यातच उसाची वाढही खुंटते आणि उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. परंतु गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये राज्यात सर्वत्र पाऊस झाल्याने त्याचा ऊस उत्पादनावर फायदा झाल्याचे म्हटले जात आहे.
विक्रमी उत्पादनाची अपेक्षा
साखर उत्पादनात यावर्षी महाराष्ट्र विक्रम करेल असा कयास लावला जात आहे. यंदा साधारणत: 75 लाख टन साखरेचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरवीत साखरेचे उत्पादन 92 लाख टनाहून अधिक झाले आहे. 13 मार्चला हे उत्पादन 92 लाख 59 हजार टन होते. अजून महिना ते दीड महिना साखर कारखाने चालतील. त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढून ते 105 लाख टनार्पयत जाण्याची शक्यता आहे. 10 वर्षापूर्वी साधारणत: सर्वाधिक 102 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्याचा विक्रम यंदा तुटेल असा साखर तज्ज्ञांचा अंदाज आहे.