ऊस वाहतूकीचा डोक्याला ताप सुरक्षेविनाच वाहतूक करतात रे बाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:28 PM2020-12-10T13:28:41+5:302020-12-10T13:28:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तीन पैकी दोन साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांना शेतकरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात तीन पैकी दोन साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांना शेतकरी ऊस देत असून यासाठी होणारी वाहतूक मात्र धोकेदायक पद्धतीने सुरक्षेविनाच होत असल्याने वाहनधारकांच्या डोक्याचा ताप वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर ऊस वाहतूक होत असली तरी शहादा तालुक्यातील शहादा ते खेतिया रस्ता सर्वाधिक धोकेदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
शहादा ते मध्यप्रदेशातील खेतिया दरम्यान पाहणी केली असता, मध्यप्रदेशातील खांडसरींमध्ये शहादा तालुक्याच्या विविध भागातून सुरू आहे. खांडसरीकडे जाणा-या ट्रॅक्टरांच्या मागे रिफ्लेक्टर असणे गरजे असतानाही एकाकडेही रिफ्लेक्टर आढळून आलेले नाही. रिफ्लेक्टर नसल्यास लाल रंगाचे कापड बांधण्याची उपाययोजनाही करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यात विशेष बाब म्हणजे शेतकरी याबाबत चालकांना सूचना करुनही ते रात्रीच वाहतूक करण्याचा अट्टाहास करत असल्याचे समोर आले आहे. ओव्हरलोड अशी ऊसाची वाहने ब्राह्मणपुरी मार्गाने मध्यप्रदेशात जातानाही प्रादेशिक परिवहन विभाग त्यांची चाैकशी करत नसल्याने आश्वर्यही व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ऊसाच्या ट्रॅक्टरवर धडकून दोघांचा बळी तर काहींना गंभीर जखमा झाल्याचे अपघात या मार्गावर घडले होते.
खेतिया ते शहादा रस्ता ठरतोय सर्वाधिक धोकेदायक
सेंधवा ते विसरवाडी असा राष्ट्रीय महामार्ग असल्याने शहादा ते खेतिया दरम्यान सध्या वाहतूक वाढली आहे. मार्गावर सध्या रस्ता कामही सुरू आहे. या रस्ता कामामुळे ब-याचवेळा वाहने थांबतात. यात ओव्हरलोड ट्रॅक्टर पंक्चर होणे, टायर फुटणे यासह विविध प्रकार घडतात. यातून रस्त्यावर ऊसाने भरलेल्या ट्राॅली थांबून मग अपघातांची शक्यता निर्माण होत असल्याने उपाययोजनांची खरी गरज आहे.
ऊस वाहतुकीमुळे वाढतात अपघात
रस्ता मार्गाने साखर कारखान्यापर्यंत ऊस वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टर, ट्रक किंवा इतर मालवाहू वाहनांचा वापर केला जातो. कारखान्यापासून ऊसाचे क्षेत्र जवळ असल्यास बैलगाड्यातून ऊस आणला जातो. या सर्व वाहनांना रात्रीच्यावेळी वाहतूक करत असताना टेल लाईट, रिफ्लेक्टर लावणे सक्तीचे आहे. परंतू बहुतांश चालक याकडे दुर्लक्ष करतात. ओव्हरलोडमुळे वाहने जागीच थांबल्यास मागून भरधाव वेगात येणारे दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी वाहनधारक त्यावर धडकून गंभीर अपघात होतात. यातून काहींना जीवही गमवावा लागल्याच्या धटना घडल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ऊस वाहतूकीबाबत सूचना केल्या आहेत. उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. जानेवारी २०२० मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत ऊस वाहतूकीचा आढावा घेत उपाययोजना करण्यावर भर देणार आहोत. तत्पूर्वी ऊस कारखानदारांनाही सुरक्षित ऊस वाहतूक करुन अपघात रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे कळवले आहे.
-महेंद्र पंडीत, पोलीस अधिक्षक, नंदुरबार.