संडे स्पेशल मुलाखत-साडेबारा हजार शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 01:05 PM2020-07-26T13:05:50+5:302020-07-26T13:06:53+5:30
राज्यस्तरावर आॅनलाईन बदल्यांची प्रक्रिया प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा आॅनलाईन बदल्यांबाबत समन्वयाची जबाबदारी पारदर्शीपणे पार पाडण्याचा आपला प्रयत्न आहे. -विनय गौडा.
मनोज शेलार।
लोकमत न्यूज नेटवर्क
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या प्रचलीत पद्धतीने अर्थात आॅनलाईन होत आहे. यासाठी पूर्वी मागविण्यात आलेल्या आॅनालाईन अर्जानुसार साधारणत: राज्यभरात १२,५०० शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती बदली प्रक्रियेचे राज्य समन्वयक तथा नंदुरबार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
राज्य समन्वयक म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे. बदल्या पूर्वीच्या आॅनलाईन पद्धतीनेच होतील का?
शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या धोरणासंदर्भात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीत आपण होतो. राज्यभर आणि इतर राज्यात दौरे केले. त्याचा अहवाल शासनाला यापूर्वीच दिला आहे. त्या कामाच्या आधारावर आपली आता राज्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आंतर जिल्हा बदल्यांसाठी पूर्वीची अर्थात गेल्या वर्षाचीच आॅनलाईन पद्धत अवलंबली जाणार आहे. आमच्या समितीने शासनाला अहवाल दिला आहे. परंतु कोविड-१९ मुळे त्या अहवालावर सध्या तरी कार्यवाही नसल्यामुळे जुन्याच आॅनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत.
किती शिक्षकांनी अर्ज केले आहेत व कितीजण त्यासाठी पात्र ठरतील?
आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत जवळपास १२,५०० शिक्षकांनी राज्यभरातून अर्ज केले आहेत. सर्व शिक्षकांच्या बिंदूनामवली मागासवर्ग कक्षाकडून तपासून त्या एनआयसी पुणे यांच्याकडून प्रमाणीत करणत येतील. त्यानंतर त्या त्या जिल्ह्याकडून रिक्त जागांची माहिती मागविण्यात आली आहे. त्या जागा आणि एकुण शिक्षकांनी केलेले अर्ज याचा समन्वय साधून या बदल्या केल्या जातील. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आंतरजिल्हा बदलीप्रमाणे जिल्हांतर्गत बदल्या देखील आॅनलाईन पद्धतीने कराव्या अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली आहे. त्याबाबत शासन स्तरावरून अद्याप काही निर्देश प्राप्त नाहीत. परंतु आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया शासन निर्देशानुसार सुरू आहे. आता १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
जिल्हाअंतर्गत बदलीसाठी आॅफलाईन प्रक्रिया सुरू आहे. या बदल्या करतांना कोविड-१९ ची सर्व आवश्यक मार्गदर्शक प्रणालीची अंमलबजावणी केली जात आहे. तालुकास्तरावरून सेवाज्येष्ठतेनुसार याद्या मागविण्यात आल्या आहेत. १५ टक्के बदल्यांच्या निकषानुसार जिल्हाअंतर्गत शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. शासनाच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार ही प्रक्रिया देखील विहित मुदतीत पुर्ण करण्यात येणार आहे. शिक्षक सोडून इतर सर्व विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण झाली असल्याचेही विनय गौडा यांनी स्पष्ट केले.