उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक लॅब नंदुरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:03 PM2020-07-19T12:03:29+5:302020-07-19T12:05:29+5:30
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून अजून विविध उपाययोजनांचे नियोजन केले असून ते प्रमाण शुन्यावर आणण्याचे नियोजन आहे. - डॉ.राजेंद्र भारूड
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सिमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे नियोजन केले होते. त्याचा निश्चित परिणाम दिसत असला तरी अजूनही वाढते रुग्ण चिंताजनक असून ते प्रमाण कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. खास करून जिल्ह्यात आतापर्यंत तपासणी प्रयोगशाळा नव्हती, सध्या सुरू झाली असली तरी त्याची क्षमता कमी असून अजूनही धुळे व इतर तपासणी लॅबवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नवीन आधुनिक तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
सध्या कोरोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत असल्याने त्यावर काय उपायोजना होत आहे.?
नंदुरबार जिल्ह्यात इतर भागाच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी हे प्रमाण अजून कमी करून ते शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यासाठी खाजगी डॉक्टरांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. जिल्ह्याकडे केवळ ३० आॅक्सीजन बेड आहेत. त्याची संख्या वाढवून ती ७५ पर्यंत होणार आहे. याशिवाय साखळी तोडण्यासाठी सर्व पातळीवर प्रयोग सुरू असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे यासह सर्व नियम पाळून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात नंदुरबार पाठोपाठ शहाद्यात रुग्ण वाढत आहेत, तेथे काय नियोजन?
नंदुरबारनंतर शहाद्यात रुग्ण अधीक आहेत. त्यामुळे शहादा येथे देखील स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न असून लवकरच ते सुरू होईल. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होतील. याशिवाय शहाद्यात क्वॉरंटाईन सेंटरही वाढविले असून रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
नंदुरबार येथे अत्याधुनिक प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी एक कोटी ६५ लाख रुपये खर्चालाही मंजुरी मिळाली असून मशिनरीची आॅडर्र नोंदविली आहे. सिंगापूरहून ही मशिनरी येत आहे. ही लॅब साधारणत: १२०० स्वॅब तपासणी क्षमतेची असून उत्तर महाराष्टÑातील सर्वात मोठी व आधुनिक लॅब ठरणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविण्याचा प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे रेशनचे वितरण चांगले झाले. नवीन किमान ३६ हजार लोकांना रेशन मिळाले व त्यासाठी १२ हजार नवीन रेशनकार्डही दिले. रोहयोच्या कामांवर जास्ततीत जास्त मजुरांना काम देण्याचा प्रयत्न झाला. ६५ हजारापेक्षा अधीक मजूर या योजनेच्या प्रवाहात आले. दुर्गम, अतिदुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन उपाययोजना केल्याने त्याची चांगले परिणाम दिसून आले आहेत.